पुणे – शिक्षण क्षेत्रातील बहुचर्चित विद्यापीठ व महाविद्यालय विद्यार्थी परिषद निवडणुकांचा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केला. त्यानुसार महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेसाठी मतदान 7 सप्टेंबर रोजी, तर निकालही त्याच दिवशी जाईल. तसेच, विद्यापीठात विद्यार्थी परिषद निवडणूक 24 सप्टेंबर रोजी होणार आहे.
पुणे विद्यापीठाने बुधवारी रात्री उशिरा विद्यापीठ निवडणूक कार्यक्रमाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार महाविद्यालयात निवडणुकीची अधिसूचना दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता प्रसिद्ध होईल. त्याच दिवसांपासून महाविद्यालय परिसरात आचारसंहिला लागू होईल. विद्यार्थी परिषदेसाठी दि. 31 ऑगस्ट रोजी अर्ज करण्याची मुदत आहे. त्यानंतर अर्ज माघारीसाठी कालावधी दि. 5 सप्टेंबरपर्यंत आहे. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केले जाणार आहे. मतदान दि. 7 सप्टेंबरला, तर मतदान मोजणी व निकाल त्याच दिवशी होणार आहे. विद्यापीठ व महाविद्यालय निवडणुकांची सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.