पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक राज्य सीईटी सेलने प्रसिद्ध केले आहे. यापूर्वी सीईटीच्या संभाव्य वेळापत्रक होते. त्यानुसार एमएचटी-सीईटीच्या पीसीबी गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिल, तर पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल दरम्यान होणार आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लॅनिंग आणि कृषी शिक्षण अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. तसेच काही अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेसाठी मुदतवाढ देखील दिली आहे. सविस्तर माहिती राज्य सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण १९ प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करणे सोईस्कर ठरते. आता टप्प्या टप्प्याने होणाऱ्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक अंतिम केले आहे. त्याप्रमाणे सीईटीच्या अभ्यासाची तयारी करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, हल्ली दहावी-बारावीच्या गुणांबरोबरच सीईटीच्या गुणांना तितकेच महत्त्व आहे. सीईटीत मिळविलेल्या गुणांवरुन प्रवेशासाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाते. त्यादृष्टीने सीईटी परीक्षा देणे महत्त्वाचे आहे. तसेच सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळू शकणार नाही. त्यामुळे सीईटी परीक्षा देणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक बनले आहे.