पुणे -सातत्याने वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्या वाढू लागल्याने महापालिकेकडून अखेर फर्गसन रस्त्यावर अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी या रस्त्यावरील साइड आणि फ्रंट मार्जिंनमधील अतिक्रमणे काढण्यासह अनधिकृत पथारी व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात आली. ही माहिती अतिक्रमण नियंत्रण विभागप्रमुख माधव जगताप यांनी दिली. या कारवाईत सुमारे 2 हजार 600 चौरसफूट अनधिकृत बांधकाम काढण्यात आले.
महापालिकेने पूर्वीच शहरातील ना फेरिवाला क्षेत्र जाहीर केली आहेत. त्यानुसार एफसी रस्ताही नो हॉकर्स झोन आहे. असे असले, तरी या रस्त्यावर सातत्याने अनाधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडल्याचे चित्र असते. केवळ व्हीआयपी दौऱ्यावेळीच हे विक्रेते गायब होतात. आता हा रस्ता ना फेरिवाला क्षेत्र म्हणून जाहीर झाल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावर कारवाईला सुरुवात केली आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी अनाधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. स्टॉल उभारून तिथे कपडे, पादत्राणे, ज्वेलरी तसेच सौंदर्य प्रसाधनांची विक्री चालते. हे स्टॉल अतिशय कमी जागेत एकमेकांना खेटून आहेत. या ठिकाणी आग लागल्यास किंवा अन्य दुर्घटना घडल्यास अनर्थ ओढावू शकतो. त्यामुळे पालिकेने ही कारवाई सुरू केल्याचे जगताप यांनी सांगितले.
या शिवाय अटी व शर्तीचा भंग करणाऱ्या 565 पथ विक्रेता व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रामुख्याने सातारा रस्ता, तिरंगा हॉटेल, गणेशखिंड रोड, नर्गिस दत्त पथ, कमला नेहरू पार्क, बीएमसीसी परिसर, आर्यभूषण, हॉंककॉंग लेन, वाकडेवाडी येथील 36 पथ विक्रेता व्यावसायिकांचे स्टॉल व साहित्य सील करण्यात आले आहे. परवानाधारकांनी स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, गॅस सिलिंडर, स्टोव्हचा वापरणाऱ्यांवर ही कारवाई केली जात आहे.