पुणे – करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयारी केली असून, बेड, ऑक्सिजन प्लांट आणि औषधांचा पुरेसा साठा या सगळ्यांची व्यवस्था महापालिकेने केली आहे.
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यादृष्टीनेच राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने नियोजन केले आहे. त्याचा आढावा दर आठवड्याला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार घेतातच, परंतु आयुक्तांनीही या संदर्भात बैठक घेऊन सूचना केल्या असून, त्यांनीही पाठपुरावा सुरू केला आहे.
यामध्ये महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 2 हजार 84 बेड आहेत. याशिवाय समाविष्ट झालेल्या भागामधील काही रुग्णालये कार्यान्वित करून त्याठिकाणचेही बेड यामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत. याशिवाय सुमारे सात ते आठ हजार बेड हे खासगी रुग्णालयांकडून नियंत्रणाखाली आणले जाणार आहे. त्यांच्याशी तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना बाधा होण्याची शक्यता गृहित धरून त्यासाठी वेगळ्या टास्कफोर्सची व्यवस्था केली आहे. त्यांच्या सूचनेनुसार महापालिका रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी सात “सीसीसी, चार “डीसीएचसी’ आणि सहा “डीसीएच’ची सोय केली आहे. या सर्वांमध्ये महापालिका रुग्णालयात 1 हजार 710 एकूण बेडची व्यवस्था केली आहे. त्यातील 1 हजार 300 बेड ऑक्सिजन शिवाय, 320 बेड ऑक्सिजनसह, 60 बेड आतिदक्षता विभागात तर 30 व्हेंटिलेटर बेड आहेत.
दरम्यान, पालिकेने जरी सज्जता ठेवली असली, तरी नागरिकांनी मात्र नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
ऑक्सिजन प्लांट
एकूण 14 हजार 33 एलपीएम क्षमतेचे 16 ऑक्सिजन प्लांटचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील 8 हजार 400 एलपीएम क्षमतेचे 10 प्लांट पूर्ण झाले असून, 5 हजार 633 एलपीएम क्षमतेचे 6 प्लांट अद्याप नियोजित आहेत. पूर्ण झालेल्यांमध्ये डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय, शिवाजीनगर मधील दळवी, बाणेर येथील जुनी डीसीएच, सिंहगड रस्त्यावरील लायगुडे, बाणेर येथील नवे रुग्णालय आणि इएसआय रुग्णालय यांचा समावेश आहे. याशिवाय नियोजित प्लांटमध्ये अण्णासाहेब मगर, वारजे रुग्णालय, बोपोडी येथील खेडेकर, येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालय आणि सोनावणे रुग्णालय यांचा समावेश आहे.
औषधे आणि अन्य साहित्य
रेमडेसिविर, म्युकर मायकोसिसवरील ऍम्फोटेरोसिन इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे. टोसिलिझुमॅब इंजेक्शन्सची निविदा प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय लहान मुलांना लागणारे “इम्युनोग्लोबिन’ या इंजेक्शनची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय पीपीई किट, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर आणि अन्य साहित्यही पुरेसे आहे. मात्र त्याची कमतरता जाणवल्यास त्याचीही खरेदी केली जाणार आहे.