पुणे -‘एफडीए’कडून रुग्णालयांची “झाडाझडती’

अन्नपदार्थांची होणार तपासणी : दर्जाहीन पदार्थ आढळल्यास कारवाई


जहांगीर रुग्णालयातील “त्या’ घटनेनंतर प्रशासन सतर्क

पुणे – रुग्णालयातील उपहारगृहातून (कॅन्टीन) रुग्णाला दिले जाणारे जेवण, नाष्टा चांगल्या दर्जाचा आहे का? आणि त्याठिकाणची स्वच्छता पाहण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) पुणे विभागातील रुग्णालयांची “झाडाझडती’ घेण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. येत्या काही दिवसांत रुग्णालयांना आचानक भेटी देऊन तेथील कॅन्टीनमध्ये अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आढळून आल्यास तत्काळ कारवाई होणार असल्याचे “एफडीए’चे सह आयुक्‍त सुरेश देशमुख यांनी सांगितले.

जहांगीर रुग्णालयात एका रुग्णाला दिलेल्या सुपमध्ये रक्‍ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आले होते. हे सूप रुग्णालयाच्या कॅन्टीनमधून आले होते. त्यामुळे या धक्‍कादायक आणि किळसवाण्या प्रकारामुळे रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये खरच चांगल्या दर्जाचे जेवण दिले जाते का, त्याठिकाणची स्वच्छता, कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि कॅन्टीनचालकाकडून अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन होते का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एफडीएने तत्काळ कॅन्टीनची पाहणी करून रुग्णालयाला 1 लाखाचा दंड ठोठावला.

दरम्यान, पुणे शहरासह राज्यात अनेक छोटे-मोठे रुग्णालय आहेत. त्यामध्ये छोट्या रुग्णालयांमध्ये सहसा कॅन्टीनची सुविधा नसते. मात्र, मोठ्या रुग्णालयांमध्ये कॅन्टीन असते आणि याच कॅन्टीनमधून रुग्णाला पौष्टीक आहार म्हणून दररोजचे जेवण, नाष्टा, चहा दिला जातो. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून पैसेही आकारले जातात. मात्र, रुग्णाला दिला जाणारा आहार खरच पौष्टीक आहे का? याबाबत शंका आहे. त्यामुळे जहांगीर रुग्णालयातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर “एफडीए’कडून पुणे विभागातील सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची तपासणी करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत स्वतंत्र टीम तयार करण्यात आली आहे. “एफडीएक’डून कधीही छापे पडू शकतात, त्यामुळे रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत.

“एफडीएक’डून पुणे विभागातील सर्व मोठ्या खासगी रुग्णालयांतील उपहारगृहांची पाहणी करण्यात येणार आहे. प्रामुख्याने रुग्णाला दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थाचा दर्जा, त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ कोणत्या दर्जाचे आहेत, उपहारगृहातील स्वछता, कर्मचाऱ्यांची स्वच्छता यासह आवश्‍यक त्या गोष्टी तपासण्यात येणार आहेत. यावेळी शासकीय रुग्णालयातील उपहारगृहांचीही तपासणी करण्यात येणार आहे.
– सुरेश देशमुख, सह आयुक्‍त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)