पुणे : मृत्यूदर कमी करण्यात अपयश

जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी कायम


नवीन बाधित संख्या घटल्याने काहीसा दिलासा

– सागर येवले

पुणे – मागील अडीच महिन्यांत ग्रामीण भागातील करोना बाधितांची संख्या झपाट्याने घटली आहे. तब्बल 6 टक्‍क्‍यांनी वेग कमी झाला आहे. मात्र, मृत्यू दर कमी करण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मृत्यूदरामध्ये किंचीत वाढ झाली असून, सध्या तो 2.6 टक्‍के आहे.

सुरुवातीला शहर पाठोपाठ ग्रामीण भागात करोना बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर मृत्यू संख्याही वाढू लागली. वेळेत निदान न होणे, निदान झाले तर रुग्णवाहिका किंवा बेड्‌स उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यू होत होते. ग्रामीण भागात दिवसाल जवळपास एक हजार बाधित सापडत होते.

मात्र, ऑक्‍टोबरमध्ये बाधित संख्या कमी होवू लागली. तर करोनामुक्‍तीचे प्रमाणही वाढू लागले. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला. परंतु, मागील अडीच महिन्यांपासून ग्रामीण भागातील मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश येत नाही.

20 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील मृत्यू दर 2.5 टक्‍के इतका होता. तालुका निहाय मृत्यूदर 2.4 टक्‍के, तर नगरपालिका हद्दीतील 2.9 टक्‍के होता. त्यानंतर ऑक्‍टोबरअखेर मृत्यूदर “जैसे थे’ आहे. 23 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान मृत्यूदरात घट होण्याएवजी वाढ झाली.

आता जिल्ह्यातील मृत्यूदर 2.6 टक्‍के झाला आहे. तालुका निहाय मृत्यूदर 2.5 टक्‍के तर नगरपालिका हद्दीतील 3 टक्‍के आहे. म्हणजे मृत्यूदरामध्ये किंचीत वाढ झाली.

रुग्णवाहिका धूळखात…
ग्रामीण भागात रुग्णांना तत्काळ रुग्णवाहिका आणि उपचारासाठी बेड मिळत नसल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतीला येणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून 56 रुग्णवाहिका खरेदी केल्या. तर एकूण 96 खरेदीचा मानस आहे. या सर्व रुग्णवाहिका ऑक्‍सिजन सुविधायुक्‍त आहेत. जेणेकरून बाधितांना तत्काळ उपचार मिळावे. मात्र, रुग्णवाहिका खरेदी करून एक महिना झाला. त्यासाठी चालक आणि इंधन द्यायचे कोणी यावरून मागील एक महिन्यांपासून रुग्णवाहिका धूळखात पडून आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.