Pune : धर्मादाय संस्थांचे ऑडिट दाखल करण्यास मुदतवाढ

पुणे – सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण झालेले वार्षिक हिशोबपत्रके (ऑडिट रिपोर्ट) मुंबई येथील मुख्य धर्मादाय कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अपलोड करण्यास तांत्रिक अडचणी येत आहेत. संस्था चालकांची ही अडचण लक्षात घेवून महाराष्ट्र राज्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ श्यामकांत कलोती यांनी वार्षिक हिशोबपत्रके दाखल करण्याची मुदत ३१ डिसेंबर पर्यंत वाढविली आहे.
याबाबतचे परिपत्रक २६ नोव्हेंबरला जारी करण्यात आले असून त्यामुळे ही मुदत एक महिन्याने वाढली आहे. ट्रस्ट कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्यात म्हणजेच तीस सप्टेंबरपर्यंत वार्षिक हिशोबपत्रके सादर करायची असतात. त्यावेळी आयकर कायद्याप्रमाणे रिटर्न भरण्याची अनिवार्य मुदत असल्याने धर्मादाय कार्यालयात दाखल करायच्या वार्षिक हिशोबपत्रकांची मुदत यापूर्वी नोव्हेंबर अखेर वाढवली होती.
दरम्यान, मुंबईतील मुख्य सर्व्हर पूर्ण राज्यातील ट्रस्ट व संस्था नोंदणी तसेच वार्षिक हिशोबपत्रके अपलोड करण्यास नेहमीच तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे वकील व संस्थाचालकांना प्रचंड मनस्ताप होतो. तो दूर करण्यास विभागीय स्तरावर सर्व्हरचे विकेंद्रीकरण तातडीने करून त्याची क्षमता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे, असे पुणे पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले.





