खाली फेकल्याने महिला वाहन बाल बालबाल बचावल्या
आयुर्मान संपूनही वापरात ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश
पुणे – एसटी महामंडळाचा हलगर्जीपणा वाहकांच्या मुळावर उठत आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून खरेदी केलेल्या तिकीट मशीनमध्ये बिघाड झालेला असतानाही आणि त्यांची कालमर्यादा संपली असतानाही त्या वापरण्याची सक्ती वाहकांना करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या मशीन्स हाताळताना त्यांचे स्फोट होत असल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या राज्यभरातील वाहकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
एसटी महामंडळाच्या तब्बल 19 हजार बसेसच्या माध्यमातून महामंडळाला महिन्याकाठी कोट्यवधींचा महसूल मिळत आहे. त्यामुळेच हा महसूल वाढविण्यासाठी महामंडळाने आठ वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून 45 हजार मशीन्स खरेदी केल्या आहेत. संबंधित कंपनीच्या सूचनेनुसार या मशीन्सची वयोमर्यादा पाच वर्षे आहे. मात्र, या मशीन्सची खरेदी करून आठ वर्षांहूनही अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे या मशीन्स बदलण्याची आवश्यकता होती. त्यासंदर्भात अनेक वाहकांनी प्रशासनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत.
त्यामुळे या मशीन्स अचानक बंद पडणे, त्यांचे चार्जिंग उतरणे, अक्षरे अस्पष्ट असणे, तिकिट अर्धवट निघणे अशा प्रकारांत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक वाहक त्रस्त झाले आहेत. हे वास्तव असतानाच या मशीन्स हाताळताना अचानक या मशीन्सचे स्फोट होत आहेत. गेल्याच आठवड्यात आर्वी आगारातील एक महिला वाहक प्रवाशांना तिकिट देत असताना या मशीनचा स्फोट झाला. मात्र, या महिला वाहकाने प्रसगांवधान राखून हे मशीन हातातून टाकून दिल्याने त्या बालबाल बचावल्या. त्यामुळे आपत्तीच्या अशा घटना टाळण्यासाठी या मशीन बदलाव्यात अशी मागणी वाहकांनी केली आहे.