fbpx

हुश्श…पुण्यात करोनाचा विळखा सुटतोय!

शहरात करोनामुक्तांचे प्रमाण 92 टक्क्यांवर

पुणे – करोनाच्या विळख्यात सापडलेले शहर आता आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नातून बाहेर पडत आहे. शहरातील करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी तब्बल 92.55 टक्के वर गेल्याने महामारीचा हा विळखा सुटत असल्याची अशा निर्माण झाली आहे. मागील नऊ महिन्यांत पहिल्यांदाच हा दर वाढला आहे. तर सक्रीय बाधितांचा आकडा पहिल्यांदाच 5 टक्के पेक्षा कमी असून तो 4.90 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.56 टक्के असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

 

करोनाबाधित पहिला रुग्ण शहरात 9 मार्चला आढळून आला होता. त्यानंतर शहरात आतापर्यंत बाधित रुग्णांचा आकडा 1 लाख 59 हजार झाला आहे. मात्र, त्यातील तब्बल 1 लाख 47 हजार 642 जणांनी करोनावर मात केली असून 22 ऑक्टोबर अखेर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात तसेच घरी सुमारे 7 हजार 349 जण उपचार घेत आहेत. शहरात पहिला रुग्ण सापडल्यापासून या साथीला अटकाव घालण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाय योजना करण्यात येत होत्या.

 

त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होण्यासही सुरूवात झाली होती. मात्र, त्यानंतर झालेला गणेशोत्सव तसेच आनलॉक मध्ये बहुतांश व्यावसाय सुरू झाल्याने शहरात पुन्हा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पुन्हा ही रुग्णसंख्या घटण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे शहरातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा टक्काही 92. 55 ट्क्केवर गेला आहे.

 

सक्रीय बाधित 7,500…

शहरातील सक्रीय बाधितांचा आकाडही गेल्या दोन आठवड्यांत 17 हजारांवरून 7 हजारांपर्यंत खाली आहे. जून महिन्यात शहरातील सक्रीय बाधितांची संख्या 7 हजारांच्या आसपास होती. त्यानंतर हा आकडा सप्टेंबर महिन्यात 20 हजारांच्या वर गेला होता. मात्र, पहिल्यांदाच तो सात हजारांपर्यंत आला असल्याने प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. या सक्रीय बाधितांमध्ये 3 हजार गृह विलगीकरणात, 4 हजार शासकीय तसेच खासगी रुग्नालयात, तर महापालिकेच्या कोवीड सेंटर मध्ये अवघे 500 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.