पुणे – 11 गावांसाठीही समान पाणी योजना

सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव लवकरच : “त्या’ 22 गावांच्या आराखड्याचेही नियोजन

पुणे – महापालिका हद्दीत दीड वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमध्येही समान पाणी योजना राबविण्यात येणार आहे. याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात स्थायी समितीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. तसेच नव्याने येऊ घातलेल्या उर्वरीत 22 गावांच्या आराखड्याचेही नियोजन करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

महापालिकेडून पुणे शहरासाठी चोवीस तास समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी सुमारे अडीच हजार कोटींचा खर्च येणार आहे. या योजने अंतर्गत शहरात नवीन 82 पाण्याच्या टाक्‍या उभारणे, सुमारे 1600 किलोमीटरच्या नवीन जलवाहिन्या टाकने तसेच शहरात सुमारे 3 लाख 20 हजार पाणी मीटर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या योजनेचा आराखडा महापालिकेकडून 2012 मध्ये तयार केला होता. त्यावेळी हद्दीजवळील या गावांच्या महापालिका समावेशाची नुसतीच चर्चा होती. ही गावे महापालिकेत घेण्याचा आदेश शासनाने 2015 मध्ये काढला होता. त्यानंतर अचानक शासनाकडून हा निर्णय मागे घेण्यात आला. त्यामुळे या गावांमधील नागरिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने 2017 मध्ये 11 गावे महापालिकेत घेण्याचे आदेश दिले. मात्र, तोपर्यंत पालिकेकडून या योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली होती.

मात्र, भविष्यात ही गावे पालिकेत येण्याची शक्‍यता असल्याने त्यासाठी आवश्‍यक असलेल्या जलवाहिन्यांचे नियोजन पालिकेकडून करण्यात आले. दरम्यान, आता शहरासाठी ही योजना राबविली जात असतानाच ही गावेही आल्याने पालिकेने या 11 गावांसाठीही समान पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्याचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात येणार असून पुढील महिन्यात हे काम सुरू होणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

22 गावांबाबतही लवकरच निर्णय
11 गावांसह पुढील काही वर्षांत महापालिकेत आणखी 22 गावे येण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन या कामासह या गावांचे सर्वेक्षण तसेच आराखडा तयार करणे शक्‍य आहे का याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. हे काम एकाचवेळी करणे शक्‍य असल्यास प्रशासनाकडून उर्वरित गावांसाठीही आताच सल्लागार नेमण्याची शक्‍यता प्रशासकीय सुत्रांकडून व्यक्‍त करण्यात आली.

“त्या’ योजनांचा विचार करून नियोजन
सल्लागार कंपनीच्या माध्यमातून या 11 गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात गावांमधील 2047 पर्यंत वाढणारी लोकसंख्या, आवश्‍यक नळजोड, नवीन जलवाहिन्या, अस्तित्वातील वितरण व्यवस्था, पाण्याचे स्त्रोत, नवीन आवश्‍यक टाक्‍या, नवीन जलवाहिन्या, आवश्‍यक असलेले पाणी मीटर तसेच योजनेचा खर्च याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यातील काही गावांमध्ये 24 तास पाणी पुरवठा सुरू असून काही गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजना सुरू आहेत. या योजनांचा विचार करून हे समान पाणी योजनेचे नियोजन केले जाणार असल्याचे सुत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.