सिंहगड रस्ता – खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रविवारी (दि. ४) ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांसाठी सिंहगड बंद राहणार असल्याचे वनविभागाकडून कळविण्यात आले.
सिंहगडावरील डोंगराचा मोठा भाग मोठ्या झाडांसह कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद केलेली आहे. दरडी काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यातच सिंहगडावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम तसेच दरड काढण्याच्या कामातही अडथळे येत आहेत.
पावसामुळे दरडीतील मातीचा चिखल झाला आहे. चिखल काढण्यास वेळ लागत आहे. परिणामी, दरड काढण्याच्या कामात अडथळे येऊ नयेत, यासाठी रविवारी गडावर प्रवेश बंद राहणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.