पुणे – एसटीच्या ताफ्यात ब्रेकडाऊन व्हॅन दाखल

पुणे – गेल्या काही वर्षांच्या कालावधीत एसटीच्या बसेस मार्गावर बंद पडण्याच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शिवशाही, हिरकणी आणि अश्‍वमेध यासारख्या वातानुकूलित तसेच आरामदायी बसेसचा सर्वाधिक समावेश आहे. यावर उपाय म्हणून महामंडळाने सुसज्ज अशी ब्रेकडाऊन व्हॅन ताफ्यात दाखल केल्या आहेत. त्यानुसार अशा प्रकारच्या 250 व्हॅन घेण्यात येणार असून त्यापैकी 50 व्हॅन ताफ्यात आल्या आहेत, त्यामुळे नादुरुस्त झालेल्या बसेसची अवघ्या काही मिनिटांतच दुरुस्ती होणार आहे.

एसटी बसेस मार्गावर बंद पडल्यास प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असतात. बहुतांशी मार्गावर प्रवाशांसाठी अन्य पर्यायी बसेसची सुविधा नसल्याने यामध्ये आणखी भर पडत आहे, त्यामुळे इच्छितस्थळी पोचण्यासाठी प्रवाशांना खाजगी बसेसच्या माध्यमातून धोका पत्करुन जावे लागत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अशा प्रकारच्या अडीचशे ब्रेकडाऊन व्हॅन घेण्यात येणार आहेत. त्यातील पन्नास व्हॅन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. या व्हॅनचा निश्‍चितच फायदा होइृल असा दावा महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

अशा असतील व्हॅनमध्ये सुविधा
* तीन ते चार तज्ज्ञ तंत्रज्ञ
* पंक्‍चर दुरुस्ती, हवा भरण्याची सुविधा
* थेट व्हॅनलाच होणार मोबाईल अथवा वायरलेसवरुन संपर्क
* अपघातग्रस्त वाहनांचीही करता येणार दुरुस्ती
* वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अपघातग्रस्त बस बाजूला करण्यासाठी खास सुविधा
* नादुरुस्त बसपर्यंत पोचण्यासाठी व्हॅनला वेळ ठरवून देणार
* व्हॅनला थेट मुख्यालयाशी वायरलेसद्वारे संपर्क साधता येणार
* कोणताही बिघाड तत्काळ दूर करता येणार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.