पुणे – लाखो रुपये खर्च केलेल्या पदपथांवर व्यावसायिकांचे अतिक्रमण

कोंढवा – लाखो रुपये खर्च करून पालिका प्रशासनाने पादचाऱ्यांसाठी पदपथाची निर्मिती करून, लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. मात्र, याच पदपथावरून विविध व्यवसाय थाटून, अनेकजण दररोज हजारो रुपयांचा गल्ला करून नामनिराळे होत आहेत. हा सर्व प्रकार पालिका कर्मचारी व पदाधिकारी वर्गाच्या डोळ्यांसमोर सुरू असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

कोंढवाखुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरातील पदपथावर मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू असून पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन भररस्त्याने चालावे लागत आहे. यामध्ये अबालवृद्ध नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. फळभाज्या, पालेभाज्या, चिकन, मटण बनवून देण्याचे काम पदपथावर चालत आहे. यामध्ये चायनिजसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात पदपथावर बनवून विकले जात आहेत. उघड्यावर अन्न शिजवून विकणाऱ्यांवर कायद्याने गुन्हा आहे. अनेक वेळा न्यायालयाने अनेकवेळा आदेश देऊन देखील प्रशासन कोणतीही काळजी घेत नसल्याचे निदर्शनास येत आहे.

लोकांचे आरोग्य धोक्‍यात येऊन देखील त्याकडे लक्ष दिले जात नाही. मात्र, पादचाऱ्यांचे हाल का, असा ही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. पदपथावरील व्यवसाय हे सायंकाळीच मोठ्या प्रमाणात सुरू होतल आहेत. बनविल्या जाणाऱ्या पदार्थांचा वास व धूर याच्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. पालिका प्रशासनातील कर्मचारी लोकांवर ज्या-ज्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत. ते आपली जबाबदारी समजून कर्मचारी व अधिकारी वर्ग अशा लोकांवर कारवाई का करत नाहीत? यामागचे गुपीत काय? हे आता नागरिकांनी शोधून काढायचे का? वरिष्ठ अधिकारी वर्गाने याची चौकशी करणे गरजेचे आहे. पदपथ रिकामे राहिले, तर पादचाऱ्यांना सुरक्षितरित्या घरी पोहचता येईल किंवा बाजारामध्ये जाता येईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.