पुणे – हडपसर परिसरातील एका कंपनीत काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी कंपनीचा गोपनीय डेटा चोरून साथीदारांना दिला. यानंतर संबंधीत कंपनीतून राजीनामा देत स्वतःची कंपनी स्थापन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कायदेशीर कराराचा भंग केल्याप्रकरणी कर्मचारी आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुंबई येथे राहणाऱ्या अनिल बाळकृष्ण वाणी(68,रा.मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. यानूसार एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादींची हडपसर परिसरात एक कंपनी आहे. कंपनीत महत्वाच्या ठिकाणी काम करणाऱ्या दोन कर्मचेऱ्यांनी गोपनीय व संवेदनशील डेटा चोरी करून त्यांच्या इतर साथीदारांना पुरविला. त्यानंतर कंपनीचा राजीनामा देऊन साथीदारांच्या मदतीने स्पर्धक कंपनी स्थापन केली.
कामगारांनी कंपनीत काम करीत असताना कायदेशीर कराराचा भंग करून कंपनीस नूकसान व्हावे, या उद्देशाने पुर्वनियोजीत कट रचल्याप्रकरणी दोन कामगार व त्यांचे साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित करत आहेत.