पुणे – वीजग्राहकांना आता अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार

पुणे – पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल, मे महिन्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात येत आहेत. या सुरक्षा ठेवीच्या रकमेचा ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते.

वीजग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव याआधी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने देयकांची रक्‍कम वाढलेली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजदेयक यातील फरकाच्या रकमेचे देयक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात येत आहे. वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार व्याज देण्याचे महाराष्ट्र विद्युत आयोगाचे आदेश आहेत. त्यानुसार महावितरणकडून एप्रिल, मे, जून या महिन्यांच्या वीजदेयकांत ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवरील व्याजाची रक्‍कम समायोजित केली जाते.

“मेक पेमेंट’चा पर्याय
पुणे परिमंडलातील लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती तसेच ऑनलाइन पेमेंटची सोय महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाइल ऍपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा भरणा ऑनलाइन करण्यासाठी “मेक पेमेंट’चा पर्याय निवडल्यानंतर येणाऱ्या देयकाच्या माहितीत सिक्‍युरिटी डिपॉझिटवर क्‍लीक केल्यास अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती उपलब्ध होईल व ती रक्‍कम ऑनलाइनद्वारे भरता येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.