पुणे : निवडणुका वेळेतच शक्‍य!

पुणे- महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास राज्य निवडणूक आयोगाने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद महापालिकेस 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. या पूर्वीच्या आदेशात निवडणूक आयोगाने हा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, पुणे महापालिकेने यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ मागितली होती. मात्र, आयोगाने 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे 5 डिसेंबरपर्यंत प्रभाग रचनेचे काम पूर्ण करून 6 डिसेंबर रोजी आयोगाच्या कार्यालयात सादर करावेच लागणार आहेत. त्यामुळे निवडणुका वेळेतच घेण्यासाठी आयोगाचे नियोजन असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यमान पुणे महापालिकेची मुदत 14 मार्च 2022 ला संपत आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी कच्चा प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना दिल्या होत्या. त्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला आणि नागपूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक या महापालिकांतील प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा सादर करण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत होती. मात्र, त्याचवेळी राज्य शासनाने 2021 ची जनगणना अंतिम झालेली नसल्याने कायद्यात बदल करून महापालिका सदस्यांची कमाल आणि किमान संख्या वाढवली आहे.

तर, पुणे महापालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश झाला आहे. त्यानुसार, महापालिकेस संपूर्ण प्रभाग रचना नवीन हद्दीच्या समावेशासह करावी लागणार आहे. त्यामुळे कच्चा आराखडा पाठविण्यासाठी महापालिकेने 15 दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. आराखडा सादर करण्याची 30 नोव्हेंबरची मुदत संपत असल्याने आयोग काय भूमिका घेणार, याकडे इच्छुकांचे डोळे लागले होते.

आयोगाची तयारी, पण “ओमिक्रॉन’चे सावट

निवडणुका वेळेत घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आराखडा सादरीकरणाची मुदत 5 दिवसांनी वाढवली असली, तरी दुसऱ्या बाजूला या निवडणुकांवर “ओमिक्रॉन’ या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आहे. यावर केंद्र व राज्य शासनाने सतर्कतेचे आदेश दिले असून, राज्यात निर्बंध लावणे सुरू झाले असून, गर्दीच्या कार्यक्रमांवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे राज्यात या व्हेरिएंटचे रुग्ण वाढल्यास त्याचा फटका या निवडणुकांना बसण्याची शक्‍यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.