पुणे – चंपाषष्ठीला वांगी, कोथिंबिर, मेथीची मोठी आवक झाली. आवक वाढल्याने वांग्याच्या भावात मोठी घट झाली. अपेक्षेएवढे भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. घाऊक बाजारात एक किलो वांग्याला प्रतवारीनुसार १० ते १५ रुपये भाव मिळाले.
चंपाषष्ठीनिमित्त नैवेद्यासाठी कांदापात, मेथी, वांग्यांना मागणी वाढते. पुणे जिल्ह्यातून मार्केट यार्डातील तरकारी विभागात कांदापात, मेथीची मोठी आवक झाली. कांदापात, मेथीच्या मागणीत वाढ झाली असून, मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने कांदापात, मेथीच्या भावात घट झाली, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली. घाऊक बाजारात मेथीच्या १०० (शेकडा) जुडीला ३०० ते ६०० रुपये असे भाव मिळाला.
कांदापातीच्या १०० (शेकडा) जुडींना एक हजार ते दीड हजार रुपये भाव मिळाले. कोथिंबिरेच्या शेकडा जुडीला प्रतवारीनुसार १०० ते ७०० रुपये भाव मिळाले, असे त्यांनी सांगितले. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात वांग्याची मोठी आवक झाली. एका प्लास्टिक जाळीत (क्रेट) १५ ते १६ किलो वांगी असतात. घाऊक बाजारात १५ ते १६ किलो वांग्याची प्रतवारीनुसार ५० ते १०० रुपये भावाने विक्री करण्यात आली.
सांगली, सातारा, बारामती, मोरगाव, फलटण परिसरातील शेतकऱ्यांनी वांगी विक्रीस पाठविली. चंपाषष्ठीला वांग्याला दर चांगले मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर वांगी विक्रीस पाठविली. मागणीच्या तुलनेत आवक चांगली झाल्याने घाऊक, तसेच किरकोळ बाजारात वांग्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.
कांदापातीची जुडी ४० रूपये…
दरवर्षी चंपाष्षठीला वांगी तेजीत असतात. साधारणपणे एक किलो वांग्याला प्रतवारीनुसार ८० ते १०० रुपये दर मिळतात. यंदा आवक मुबलक झाल्याने वांगी स्वस्त झाली. कांदापातीला मागणी चांगली होती. किरकोळ बाजारात कांदापातीच्या एक जुडीची विक्री ४० रुपयांना करण्यात आली, तसेच मेथीच्या एका जुडीची विक्री १५ ते २० रुपये भावाने करण्यात आली, अशी माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.