पुणे : महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील बालवाडी, तसेच १ ली ते आठवीच्या मुलांसाठी तब्बल ६ कोटींचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी शासनाने महापालिकेस काही ठराविक कंपनीचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एका ठराविक कंपनीचे साहित्य घेण्यासाठी सूचना केल्या होत्या. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ही खरेदी करण्यात आली आहे. शाळांचे शैक्षणिक वर्ष संपताना ही खरेदी होणार असल्याने पुढील वर्षीच त्याचा उपयोग होणार आहे.
स्थायी समितीच्या मान्यतेनुसार महापालिकेच्या शाळांमधील बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी लेखन कौशल्य साहित्य खरेदी करण्यात आले आहे. यात कला, क्राफ्टची पुस्तके, लेखन साहित्य, तसेच पाट्या आणि खडू असणार असून, त्यांची किंमत २ कोटी ३ लाख रुपये आहे. पहिली ते आठवीच्या मुलांसाठी कार्यानुभवाची आणि कलेची पुस्तके घेण्यात आली असून, हे साहित्य ३ कोटी ५२ लाख रुपयांचे आहे. बालवाडीसाठी जादूई पिटारा खरेदी करण्यात आला असून, त्यासाठी ६० लाखांच्या निविदेस मान्यता देण्यात आली आहे.
डीबीटीला हरताळ?
महापालिकेकडून शालेय मुलांना २०१७ पासून शैक्षणिक साहित्य, तसेच गणवेशासाठी डीबीटीच्या माध्यमातून पैसे दिले जातात. मुलांना देण्यात येणाऱ्या साहित्याचे दर मागवून त्यानुसार मुलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात. मात्र, काही ठराविक कंपन्यांचे साहित्य घेण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिल्याने निविदा काढून ही खरेदी केली असून, आपल्याच डीबीटीच्या धोरणाला हरताळ फासला आहे.
गुणवत्तेचे काय…
महापालिकेकडून प्राथमिक शिक्षणासाठी सातशे ते आठशे कोटींचा खर्च केला जातो. मात्र, त्यानंतरही शाळांमधील मुलांना लिहता, तसेच वाचता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर काम करणे आवश्यक असताना गरज नसलेले साहित्य खरेदी करण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.