पुणे – देखभाल नसल्याने ‘ई-तिकीट मशीन’ भंगारात!

छपाई केलेली तिकिटे देण्याची पीएमपी प्रशासनावर नामुष्की

– नाना साळुंके

पुणे – पीएमपीएमएल प्रशासनाला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या “ई-तिकीट’ मशीनची तब्बल तीन वर्षे देखभाल आणि दुरुस्तीच केली नसल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी, या मशीन दिवसांतून पाच ते सहा वेळा बंद पडत आहेत. त्याचा त्रास वाहक आणि प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी 15 कोटी रुपयांचा खर्च करुन खरेदी करण्यात आलेल्या या मशीन अक्षरश: “भंगारात’ निघाल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे छपाई केलेली तिकिटे देण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.

शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील काही भागात धावणाऱ्या पीएमपी बसेसची संख्या अपुरी असली, तरी प्रशासनाला महिन्याकाठी किमान 70 ते 80 कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे. प्रवाशांना झटपट तिकिटे देणे सोपे व्हावे या हेतूने प्रशासनाच्या वतीने बंगळुरू येथील कंपनीकडून साडेचार हजार “ई- तिकीट मशीन’ घेतल्या आहेत. त्या चांगल्या पद्धतीने हाताळता याव्यात, यासाठी सर्व वाहकांना प्रशिक्षणही देण्यात आले होते.

या मशीन खरेदी करताना संबधित कंपनीने या मशीनची किमान सहा महिन्यांतून एकदा “सर्व्हिसिंग’ करण्यात यावी, तसेच या मशीनची शाई बदलण्यात यावी अशा सूचना केल्या होत्या. तसेच स्वत:चे काम संपल्यानंतर वाहकाने ही मशीन चार्जिंगला लावावी, असे बंधनकारक करण्यात आले. मात्र, गेल्या तीन वर्षांत साडेचार हजार मशीनपैकी एकाही मशीनचे सर्व्हिसिंग करण्यात आलेले नाही. यासंदर्भात सर्वच डेपोंमधील वाहकांनी त्यांच्या डेपो प्रमुखांकाकडे तक्रारी केल्या होत्या.

मात्र, प्रशासनाला अद्यापही जाग आलेली नाही. विशेष म्हणजे प्रशासनाने त्यावर आणखी एक जालिम उपाय शोधला आहे, या मशीन बंद पडल्यानंतर वाहकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी छपाई केलेल्या तिकिटांचा अतिरिक्त ट्रे देण्यात आला आहे. त्यामुळे वाहकांचा त्रास आणखी वाढला असून त्यांना या मशीन आणि छपाई केलेल्या तिकिटांचा ट्रेचे ओझे वागविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

असा होतोय नादुरुस्त मशीनचा त्रास
– चार्जिंग करुनही मशीनचे चार्जिंग उतरणे
– तिकिट अर्धवट निघणे
– तिकिटावरील अक्षरे पुसट असणे
– तिकिट अडकणे
– बटणे दाबली न जाणे

या मशीन नादुरुस्त असल्याच्या आणि त्यामध्ये सातत्याने बिघाड होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार या मशीनची सर्व्हिसिंग करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, त्याशिवाय गरज भासल्यास आणखी काही मशीनची खरेदी करण्यात येणार आहे.
– नयना गुंडे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Leave A Reply

Your email address will not be published.