पुणे – न्यायालयात दावा दाखल करण्यापासून त्याच्या निकालापर्यंत वकिलांना विविध टप्प्यांची माहिती असावी लागते. दाव्याच्या स्वरूपानुसार या टप्प्यांत बदल देखील होतात. त्यामुळे हे सर्व शिकण्यासाठी नवोदित वकिलांना मोठा वेळ द्यावा लागतो.
सुरुवातीचे काही वर्ष त्यांना या प्रक्रियेतील विविध बाबी समजून घेण्यात जातो. तसेच बऱ्याचदा हे टप्पे वरिष्ठ वकील हातातायचे. त्यामुळे ज्युनिअर वकिलांना ही माहिती सहजासहजी उपलब्ध होत नसे. मात्र, ई-फायलिंगमुळे ही स्थिती बदलली असून नवोदित वकिलांना काही महिन्यांतच हे टप्पे समजून घेता येत आहेत.
न्यायालयीन कामकाजात अद्ययावतपणा येण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयापासून अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत अनेक बाबी डिजिटल स्वरूपात करण्यात आल्या आहेत. दावा दाखल करताना देखील तो ऑनलाईन स्वरूपात असावा, असे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे दाव्यातील सर्व कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड केली जात आहेत.
या सर्व कामात वरिष्ठ त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांची मदत घेतात. तंत्रस्नेही असलेले नवोदित वकील या सर्व बाबी अगदी सहजपणे हाताळत आहेत. त्यामुळे दाव्यातील विविध टप्पे समजून घेणे नवोदित वकिलांना सोपे झाले आहेत.
“गेल्या काही महिन्यांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेत तांत्रिकदृष्ट्या अद्ययावतपणा वाढलेला आहे. त्याचा नवोदित वकिलांना विविध स्वरूपाच्या दाव्यांचे टप्पे तसेच कोणत्या वेळी काय अर्ज करावे, त्याची प्रक्रिया काय असते या सर्व बाबी सहजपणे समजत आहेत. वरिष्ठ वकील त्यांच्या कनिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने या सर्व डिजिटल बाबी हाताळत असल्याने नवीन वकिलांना ती सर्व माहिती समजते. तसेच ते स्वतःदेखील याबाबत ऑनलाइन तसेच आपल्या वरिष्ठांकडून माहिती घेतात. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता नवोदित वकील लवकर तयार होत आहेत. ई-फायलिंग प्रणालीने न्यायालयीन प्रक्रियेत गतिशीलता आणली आहे. वरिष्ठ आणि नवोदित वकिलांना आधुनिक प्रणालीचे अनेक फायदे होत आहेत.” – ॲड. गजेंद्र भोयर, फौजदारी वकील
* ई- फायलिंगचे नवोदित वकिलांना होत असलेले फायदे *
– न्यायालयात सादर करण्यासाठीची कागदपत्रे शोधत बसावे लागत नाही
– डिजिटल प्रणालीद्वारे कागदपत्र सांभाळणे सोपे झाले आहे
– दर वेळी कागदपत्रांवर अवलंबून राहावे लागत नाही
– वेळेच बचत होत असल्याने न्यायालयातील अन्य कामांवर लक्ष केंद्रित करता येते
– दाव्याची स्थितीची आणि न्यायालयातील प्रक्रिया अधिक पारदर्शक होते
– नवीन वकिलांना त्यांच्या दाव्याची स्थिती सहज समजते
– डिजिटल प्रणालीचा वापर केल्यामुळे तांत्रिक कौशल्य वाढते
– कामाचे नियोजन प्रभावीपणे करता येते
– दाव्याचा माहिती सहजपणे हाताळते येते व त्यात बदल करणे किंवा संदर्भ घेणे सोपे झाले
– वरिष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची अधिक संधी लवकर मिळते