पुणे –गेल्या काही वर्षांत जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीची मोजणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्यादेखील वाढली आहे. गतीने आणि अजूक मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाकडून सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअंतर्गत यापूर्वीच ई-मोजणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आता ई-मोजणी व्हर्जन 2 ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज आणि मोजणीचे पैसेसुद्धा घरबसल्या भरता येणार आहे.
सध्याच्या कार्यपद्धतीनुसार जमिनीची मोजणी करावयाची असेल, तर भूमि अभिलेख कार्यालयात जावे लागते. तेथे लेखी अर्ज केल्यानंतर मोजणीचे चलन दिले जाते. ते चलन घेऊन बॅंकेत भरल्यानंतर त्याची प्रत पुन्हा भूमि अभिलेख कार्यालयात दाखल करावी लागते. त्यानंतर तो अर्ज भरला जातो. त्यानंतर मोजणी कोणत्या तारखेला होणार आहे, सर्व्हेअर कोण असणार आहे, यांची माहिती मिळते. या कार्यपद्धती पूर्ण करण्यास नागरीकांचा मोठा वेळ जातो. त्यानुसार मोजणी कार्यालयातदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या सर्व गोष्टींचा विचार करून भूमि अभिलेख विभागाने ई-मोजणी व्हर्जन2 हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
हवेली, बारामती राज्यातील दहा तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक असलेली संगणकप्रणाली “एनआयसी’च्या मदतीने विकसित करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी या दहा तालुक्यांत लागू केली आहे. यामध्ये जमिनींच्या मोजणीसाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यानंतर त्यासाठीचे मोजणी शुल्क ऑनलाइनच कळणार आहे. ते भरण्याची सुविधादेखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे भूमि अभिलेख कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आता राहणार नाही.
– किशोर तवरेज, उपसंचालक, पुणे प्रदेश, भूमि अभिलेख विभाग