पुणे – रेल्वे मार्गांचा विस्तार व्हावा, ट्रेन्सची संख्या वाढावी, प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी यासाठी मध्य रेल्वेकडून बहुतांश लोहमार्गांचे दुहेरीकरण सुरू आहे. त्यामध्ये पुणे-मिरज या २८० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत झालेल्या कामामुळे ट्रेन्सचा वेगही वाढला, मात्र गाड्यांची संख्या वाढली नसल्याचे चित्र आहे.
या मार्गावरून दिवसाला सहाच एक्स्प्रेस आणि तीन लोकल ट्रेन धावतात. त्यामुळे हजारो कोटींचा खर्च करून मार्ग तयार केला, पण मार्गावर गाड्याच नसतील तर प्रवाशांची गैरसोय कधी टळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मध्य रेल्वेने चार हजार ८८२ कोटी रूपये खर्च मंजुरी देत पुणे-मिरज या २८० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे कामाला २०१६ मध्ये सुरू केले. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, काही ठिकाणच्या भूसंपदनामुळे आणि करोना स्थितीमुळे कामाला विलंब झाला.
दरम्यान, जुन्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तर तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे अशा दोन टप्प्यांतील १८ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे.
उर्वरित ६३ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे. तयार झालेल्या २१७ किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सध्या या मार्गाचे दुहेरीकरण काम ८७ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे तातडीने या मार्गावर गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
पुणे मिरज रेल्वे दुहेरीकरण मार्गाच्या कामाची माहिती
– पुणे मिरज रेल्वे मार्गाची एकूण लांबी- २७९.०५ किलोमीटर
– दुहेरीकरण पूर्ण – १७४.८५ किलोमीटर (६२.६५ टक्के)
– प्रकल्पाची एकूण किंमत- ४८८२.५३ कोटी
– आजपर्यंतचा खर्च- ३२०० कोटी (६५.५३ टक्के)
– आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची प्रगती- ८७ टक्के