सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परिपत्रक प्रसिद्ध
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित पारंपरिक महाविद्यालये येत्या 11 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. पहिल्या सत्रातील शिक्षण ऑनलाइनद्वारे बहुतांशपणे पूर्ण झालेले आहेत. त्यातील प्रात्यक्षिक पूर्ण करण्यासाठी ही महाविद्यालये सुरू होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार महाविद्यालये सुरू होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीची सोमवारी विद्यापीठात बैठक झाली. त्यानंतर महाविद्यालये प्रत्यक्षपणे सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले.
पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट आणि शोधप्रबंध पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यानंतर पहिल्या सत्रातील परीक्षा होतील.
“व्यावसायिक’ अभ्यासक्रम महाविद्यालयेही लवकरच
अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, एमबीए या सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया अजून सुरू आहे. या व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये सुरू होण्यास आणखी कालावधी लागणार आहे. मात्र अन्य महाविद्यालये येत्या
11 जानेवारीपासून प्रत्यक्षात सुरू होतील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.