पुणे(प्रतिनिधी) – गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. नाईक यांनी जामीन मंजूर केला.
हेंमती साडेतीन वर्षांपासून तुरुंगात आहेत. त्यांना जितकी शिक्षा होऊ शकते. त्यापेक्षा अर्धी शिक्षा भोगली आहे. त्यांचे वय आणि करोना स्थितीचा विचार करत हेंमती यांना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. आशुषोष श्रीवास्तव यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने यावर निकाल दिला.
या प्रकरणात डीएसके यांच्यासह पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, बंधू मकरंद कुलकर्णी, पुतणी, जावई यांच्यासह इतर अनेकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर एमपीआयडी, फसवणूकसह विविध कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
डीएसके आणि हेमंती कुलकर्णी यांना फेब्रुवारी 2018 साली या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही सुरुवातील पोलीस व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. कुलकर्णी दांपत्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांच्यासह काहींना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर डीएसके दांपत्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. शिरीष कुलकर्णी यांनी त्याचे वकील आशिष पाटणकर आणि अॅड. प्रतीक राजोपाध्ये यांच्या मार्फत सत्र न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल केला होता . त्यानंतर हेमंती यांनी अॅड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.