पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची गंभीरपणे दखल घेऊन धानोरी येथील जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष शशिअण्णा टिंगरे यांच्या पुढाकाराने येरवडा कारागृह व धानोरी परिसरात विविध ठिकाणी मोफत औषध फवारणी करण्यात आलेली आहे. नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
दिवसेंदिवस करोनाचा प्रसार वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनीलअण्णा टिंगरे व धानोरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनीलदादा टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष शशिअण्णा टिंगरे यांनी मोफत औषध फवारणी करण्याचा संकल्प बांधला व त्वरित त्याची अंमलबजावणी ही सक्षमपणे सुरु केलेली आहे.
प्रभाग क्रमांक 1 मधील धानोरी परिसरात विविध ठिकाणी औषध फवारणी करण्याला प्राधान्य दिले आहे. धानोरी गावठाण, सिद्धार्थ नगर, मुंजाबावस्ती, कमल पार्क , भैरवनगर, गोकुळ नगर आदी भागात औषध फवारणी पूर्ण करण्यात आलेली आहे. भाजी मंडई, बस थांबे, विविध रहिवासी सोसायट्या व इतर गर्दीच्या ठिकाणी औषध फवारणी करण्यात आलेली आहे.
उर्वरित भागातही औषध फवारणी चे काम सुरुच ठेवण्यात आले आहे. लवकरात लवकर धानोरी प्रभागातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शशिअण्णा टिंगरे यांनी सांगितले आहे.