पुणे – राज्यातील किमान तापमानात घट होत असून, बुधवारी (दि. 6) महाबळेश्वर सर्वांत कमी 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली पारा नोंदविण्यात आला. दरम्यान, राज्यातील काही भागात थंडीला सुरवात झाली असून, पुणे शहर आणि जिल्ह्यातही थंडीचा जोर वाढू लागला आहे.
राज्यात आॅक्टोबर हिटमुळे 38 अंशांपर्यंत पोहचलेले कमाल तापमान 32 अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे महाबळेश्वर, पुणे, सातारा यासह अन्य काही जिल्ह्यांत रात्रीतील हवेत गारवा वाढलेला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी थंडीचा जोर वाढलेला आहे. मात्र, आज दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असल्याने कमाल तापमानात एक ते दोन अंशांनी वाढ झाली होती.
31 अंशांपर्यंत खाली आलेले कमाल तापमान 34 अंशावर पोहचले तर पहाटे किमान तापमान 17 अंशापर्यंत खाली नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील दोन दिवस हवामान कोरडे राहील. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण तर रात्री गारवा जाणवेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.