पुणे – उच्च शिक्षण संचालनालयातील उच्च शिक्षण संचालक पदावरून डॉ. धनराज माने यांना हटविण्यात आले आहे. मात्र डॉ. माने यांनी अद्यापही आपली केबिन सोडलेली नाही. अधिकाऱ्यांनी ठराविक केबिनसाठीच हट्ट धरल्यामुळे अधिकाऱ्यांमधील धुसफूस नाट्य रंगू लागले आहे. पद गेले तरी अधिकाऱ्यांना केबिनचा एवढा “मोह’ कशाला हवा, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांमधील केबिनचा तिढा सोडविण्यासाठी शासनालाच हस्तक्षेप करावा लागणार आहे.
वैद्यकीयदृष्ट्या अनफिट असल्याच्या कारणावरून डॉ. धनराज माने यांना उच्च शिक्षण संचालक पदावरून हटविण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला. याबाबतचे आदेश 16 नोव्हेंबर 2022 रोजी शासनाकडून जारी करण्यात आले. अमरावती येथील शासकीय विदर्भ ज्ञान संस्थेतील राज्यशास्त्र विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे उच्च शिक्षण संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. हा कार्यभार अतिरिक्त असला तरी तो पूर्ण वेळ देण्यात आलेला आहे.
डॉ. माने यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसंबंधीचे कामकाज सोपविण्यात आले आहे. मात्र शासनाने त्यांची कार्यकक्षा, बैठक व्यवस्था, पद याबाबत काहीच निश्चित धोरण स्पष्ट केलेले नाही. यामुळे मोठा तिढा निर्माण झालेला आहे. डॉ. माने यांच्याकडून डॉ. देवळाणकर यांनी उच्च शिक्षण संचालकपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. मात्र डॉ. माने यांनी अद्यापही आपली खुर्ची आणि केबिन सोडलेली नाही. दरम्यान, डॉ. देवळाणकर यांना सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांच्या केबिनमध्ये बसावे लागत आहे. तर डॉ. बच्छाव यांना शैक्षणिक समन्वयक डॉ. प्रशांत मगर यांच्या केबिनमध्ये बसण्याची वेळ आली आहे. डॉ. मगर यांना एका प्रशासन अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसावे लागत आहे. दरम्यान, डॉ. देवळाणकर यांच्याकडे उच्च शिक्षण संचालक पदाची सूत्रे आली असली तरी त्यांना अद्यापही संचालकांची केबिन मिळालेली नाही. वास्तविक नियमाप्रमाणे त्यांना उच्च शिक्षण संचालकांची सद्यस्थितीतीलच केबिन मिळायला पाहिजे, असा सूर संचालनालयातील अधिकाऱ्यांमध्ये उमटत आहे.
वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हरिभाऊ शिंदे हे महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर गेले होते. आता शिंदे-फडणवीस सरकार आल्याने व त्यांचा प्रतिनियुक्तीचा कालावधी संपल्यामुळे ते उच्च शिक्षण संचालनालयात पुन्हा आले आहेत. मात्र त्यांच्या पूर्वीच्या केबिनमध्ये प्रशासन अधिकारी प्रमिला मराठे बसत आहेत. यामुळे शिंदे यांनाही अद्यापही कामकाज करण्यासाठी त्यांची मूळ केबिन मिळालेली नाही. आपापल्या मूळ केबिनवर अन्य कोणी अधिकाऱ्यांनी ताबा घेऊ नये म्हणून काही अधिकाऱ्यांमध्ये सकाळी लवकर येऊन केबिनमध्ये बसण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. केबिनच्या हट्टासाठी अधिकाऱ्यांमधील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.