पुणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली कारागृहात असलेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा ( डीआरडीओ) माजी संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात आरोप निश्चितीचा मसुदा विशेष न्यायालयात सादर करण्यात आला आहे. कुरुलकर याच्या विरोधात दहशतावद विरोधी पथकाने ( एटीएस) २०२३ मध्येच दोन हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आरोप निश्चित करून लवकरात लवकर खटला सुरु करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी या प्रकरणाच्या आरोप निश्चितीचा मसुदा सादर केला. हनी ट्रॅपमध्ये अडकून झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. प्रदीप कुरुलकर याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ४ मे २०२३मध्ये अटक केली.
एटीएस ने कुरुलकर विरोधात आरोपपत्र दाखल केले असून, त्यात कुरुलकर याने पाकिस्तानी हेरांना कशा पद्धतीने माहिती पाठवली याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या कुरुलकर कारागृहात आहे. कुरुलकरने वकिलांमार्फत जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, हा अर्ज प्रलंबित आहे.
देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचेल असे कृत्य कुरुलकर याने केले आहे. देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानी हेराला पोहोचविली आहे. हा खटला लवकरात लवकर सुरु होऊन संपवावा यासाठी आरोप निश्चितीचा मसुदा तातडीने न्यायालयात सादर केला आहे. मात्र हा मसुदा डिस्चार्ज करावा असा अर्ज बचाव पक्षाने दिला आहे- उज्वला पवार, विशेष सरकारी वकील