हडपसर – महापालिकेकडून विकसन हक्क हस्तांतरण (टीडीआर) मागील काही वर्षांपासून पाठपुरावा करूनही होत नसल्याने जागामालकाने काळेपडळकडे जाणारा डीपी रस्ता पत्रे लावून बंद केला आहे. महापालिकेच्या “शासकीय’ कामाचा फटका आता परिसरातील हजारो नागरिकांना बसला आहे.
हडपसर येथील सर्व्हे नंबर 54 मधील हांडेवाडी रोड, महात्मा फुले चौक, जेएसपीएम कॉलेज, कुमार केबल पार्क सोसायटी जवळून डीपी रस्ता गेलेला आहे. यासाठी संपादीत जागेचा विकसन हक्क हस्तांतरण (टीडीआर) पालिकेकडून अद्यापही देण्यात आलेला नाही. यासाठी जागामालक चार वर्षांपासून महापालिकेत पाठपुरावा करीत आहे. मात्र, पालिका प्रशासनाची याबाबत उदासीनता दिसून येत आहे. पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याने जागामालकाने सोमवारी (दि.27) या रस्त्यावर पत्रे लावून वाहतूक बंद केली आहे.
या परिस्थितीमुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत जागामालक योगेश घुले व विश्वास भापकर म्हणाले की, डीपी रस्त्यासाठी आमची जागा महापालिकेने संपादीत करून तेथून 18 मीटरचा रस्ता विकसीत केला आहे. मात्र, मोबदला म्हणून देण्यात येणारा “टीडीआर’ चार वर्षे पाठपुरावा करूनही मिळालेला नाही, त्यामुळे आम्ही रस्ता बंद केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास
ढाकणे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
महापालिकेच्या संबंधीत अथिकाऱ्यांकडून जागामालकाला टीडीआर दिला गेला असता तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी, कामगार व इतर प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हा प्रश्न लवकर सोडवावा, अन्यथा आंदोलन केले जाईल.
– विजया वाडकर, माजी नगरसेविका