बारामतीत चौघांना अटक
वरवंड/ लोणी काळभोर : दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा भागात भानोबा मंदिरासमोर रात्री अकराच्या सुमारास दोन तरुणांची काठ्या, तलवारी आणि दगडाने ठेचून हत्या केली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुहेरी हत्याकांडातील फरारी झालेले चौघे आरोपी 12 तासांतच जेरबंद केले.
शिवम संतोष शितकल (वय 23) गणेश रमेश माखर (वय 23, दोघेही रा. अंबिकानगर, पाटस, ता. दौंड), असे मरण पावलेल्या युवकांची नावे आहेत. महेश ऊर्फ मन्या संजय भागवत (वय. 22), महेश मारुती टुले (वय 20, दोघेही रा. पाटस, तामखडा, ता. दौंड), युवराज रामदास शिंदे (वय 19, रा. गिरीम,मदनेवस्ती, ता. दौंड), गहिनीनाथ बबन माने (वय 19, रा. गिरीम, राघोबानगर, ता. दौंड), अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.4) रात्री भानोबा मंदिरानजीक फोनवरून शिवीगाळ का केली, म्हणून शिवम आणि गणेश हे आरोपींना जाब विचारायला गेले. त्यावेळी दोघांनी आरोपींनी काठ्या, तलवारी आणि डोक्यात दगड घालून हत्या केली. यानंतर सर्व आरोपी पसार झाले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, महेश गायकवाड, नीलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड आदींचे पथक नेमले.
आरोपी हे बारामती विमानतळ रस्त्यावरील वनविभागाच्या जागेत लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खून प्रकरणातील इतर चार ते पाच जणांचा सहभाग आहे. ते पसार झाले असून पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत. तपास यवत पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील करीत आहेत.
दुहेरी हत्याकांडप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुरावे गोळा करून सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवार (दि.5) सकाळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाची आणि आरोपीच्या घराची पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.