पुणे : “आरटीई’अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन व पारदर्शक आहे. लॉटरी पद्धतीने सोडत काढून विद्यार्थ्याला प्रवेश दिला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप केला जात नाही. त्यामुळे पालकांनी या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी केले आहे.
या प्रवेशासाठी पालकांना प्रलोभन दिले जात असल्याचे समोर आल्यास जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, महापालिका व नगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे.
संबंधित विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालय ([email protected]), शिक्षण आयुक्त ([email protected]) यांचेकडे ई-मेलद्वारे अथवा समक्ष आपली तक्रार पुराव्यासह नोंदविता येणार आहे.
कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर नियमानुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही गोसावी यांनी दिला आहे.