पुणे – शहरातील शाळा, महाविद्यालय सुरू झाली. रस्त्यांवर स्कूल बस, व्हॅनची गर्दी वाढली. मात्र, आपल्या मुलांची स्कूल बस किंवा व्हॅनचे फिटनेस सर्टीफिकेट आहे का? खरच सर्व नियमांचे पालन करून बस रस्त्यावर धावते का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, आजही शहरातील एक हजार ३०३ स्कूल व्हॅन व बस या फिटनेस सर्टिफिकेट नसताना धावत आहेत. आता, अशा फिटनेस संपलेल्या स्कूल बसवर आरटीओकडून कारवाई सुरू केली जाणार आहे.
शहरात पुणे आरटीओकडे नोंद असलेल्या स्कूल व्हॅन व बसची संख्या जवळपास सात हजार १०३ इतकी आहे. या सर्व स्कूल व्हॅन व बसमधून दिवसाला साधारण चार लाखांच्या पुढे विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. प्रत्येक वर्षी स्कूल व्हॅनला स्कूल बस नियमावलीनुसार योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करून घ्यावे लागते.
नवीन शैक्षणिक वर्षे १६ जूनपासून सुरू झाले. शाळा, महाविद्यालये सुरू होण्यापूर्वीच सर्व स्कूल व्हॅन आणि बसचालकांनी वाहनाचे योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण (फिटनेस) करून घ्या, असे आवाहन पुणे आरटीओकडून करण्यात आले होते. यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील कामकाज सुरू ठेवण्यात आले होते. तरीही सात हजार १०३ पैकी पाच हजार ७०० स्कूल बस आणि व्हॅन यांनीच योग्यता प्रमाणपत्राचे नुतनीकरण करून घेतले. तर, इतर स्कूल व्हॅन व बस विना प्रमाणपत्राच्या धावत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व स्कूल बस मालकांनी तत्काळ आपल्या वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र तातडीने नुतनीकरण करून घ्यावे. योग्यता प्रमाणपत्राचे नूतीनकरण न करता वाहन रस्त्यावर आणल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
– स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
महत्त्वाचे मुद्दे
- शहरातील एकूण स्कूल व्हॅन व बस संख्या – ७ हजार १०३
- फिटनेसह सर्टिफिकेट नूतनीकरण केलेली वाहने – ५ हजार ७००
- फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण न केलेल्या वाहनांची संख्या – १ हजार ३०३
पुणे आरटीओकडे सद्यस्थितीत सात हजार १०३ स्कूल व्हॅन आणि बसची अधिकृत नोंद आहे. मात्र, प्रत्यक्षात खासगी बस, व्हॅन याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते. अनेक शाळांवर या खासगी वाहनांतून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितततेच्या दृष्टीने केलेल्या नियमांना हरताळ फासला जातो. त्यामध्ये रिक्षांचाही समावेश असून, या नोंदणी नसलेल्या खासगी वाहनांचे काय? त्यांच्यावर अंकुश कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतो.