पुणे – समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता आहारस्वास्थ्य आणि जीवनशैली या विषयावर डॉ. सोनल पुरोहित (संचालक , सत्व लाईफस्टाईल मॅनेजमेंट) पुणे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी याचे आयोजन केले होते.
पोलीसांचे धावपळीचे व धकाधकीचे जीवनशैली मुळे त्यांचे दैनंदिन आहारावर विपरित परिणाम होत असतो. यामूळे आहारस्वास्थ्य नसल्याने त्यांना विविध आजारपणांचा सामना करावा लागतो. याशिवाय पोलीसांचे कामाचे व्यस्त वेळांमुळे त्यांच्या आहाराच्या वेळा देखील अनियमित असतात यामुळे पोलीसांना सहजासहजी उपलब्ध होणारा फास्टफुड सारखा आहार त्यांचेकडून घेतला जातो. याबद्दल डॉ. सोनल पुरोहित यांनी सोप्या व सहज भाषेत आपले घरगुती आहाराचे व त्याचे खाण्याचे प्रमाण कसे असावे याचे महत्व विशद करुन सांगितले.
तेलकट व मसालेदार खाणे हे चविष्ट जरी वाटले तरी त्याचे शरीरावर दुष्परिणाम होत असतात. यामुळे याचे सेवन अल्प प्रमाणातच घेतले पाहिजे. तसेच घरगुती आहार घेताना देखील शक्यतो त्याच्या वेळा नियमित ठेवाव्यात मांसाहार हा देखील कमी प्रमाणात असावा. याच प्रमाणे दररोज प्रत्येकाने किमान पंचेचाळीस मिनीटे व्यायाम केला पाहिजे. तसेच पुरेशी व योग्य प्रमाणात झोप देखील घेतली पाहिजे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी समर्थ पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार व त्यांचे कुटंबिय उपस्थित होते.