पुणे – “प्राण’वायूशीच डॉक्‍टरांचा खेळ

जिल्हा प्रशासनाच्या परीक्षणात आढळल्या अनेक गंभीर त्रुटी

सागर येवले

पुणे -जिल्ह्यातील रुग्णालयात भेडसावणारा ऑक्‍सिजनचा तुटवडा हा रुग्णालयांच्या बेपर्वाई आणि निष्काळजीपणाचा परिणाम असल्याचे भीषण वास्तव जिल्हा प्रसासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर रुग्णाला आयुष्यभर भेडसावू शकेल अशा समस्येला निर्माण करू शकण्याएवढा ऑक्‍सिजन काही ठिकाणी दिला जात आहे. तर किती ऑक्‍सिजन घ्यायचा हे रुग्णच ठरवत असल्याचेही या सर्वेक्षणात समोर येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍सिजन कसा द्यावा याची सूचनाच आता जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ऑक्‍सिजन तुटवडा जाणवू लागल्यानंतर त्याचे परीक्षण करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले. त्यानुसार त्याची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्यावर सोपवली. त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील 225 प्राध्यापकांना या परीक्षणासाठी प्रशिक्षित केले. त्यांचे प्रत्येकी दोन सदस्य असे 111 गट बनवून त्यांना परीक्षणासाठी पाठवले. त्यातील काही प्राथनिक अहवाल जिल्हा प्रशासनाच्या हाती आले आहेत. त्यातून ही धक्कादायक माहिती हाती आली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयात ऑक्‍सिजन गळती ही नियमित बाब आहे. ही गळती ऑक्‍सिजन टाकी ते रुग्ण यांच्यादरम्यान अनेक ठिकाणी आढळून आली आहे. ऑक्‍सिजन मास्क, पाईप, व्हॉल्व्ह अशा अनेक ठिखाणी ही गळती होत असल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत त्या रुग्णालयांना त्याची नियमित देखभाल आणि दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे देशमुख यांनी सांगितले. सर्वात आढळलेली भयावह बाब म्हणजे रुग्णाला ऑक्‍सिजन देताना त्याची पातळी 90 ते 92 ठेवणे आवश्‍यक असते.

मात्र, काही रुग्णालयांत ही पातळी 98 एवढी भयावह असल्याचे आढळून आले आहे. ही पातळी बाधिताच्या फुफ्फुसांना हानी पोहोचू शकते. काही प्रसंगात ती निकामी होऊ शकतात, असे वैद्यकीय क्ष्रेत्रातील तज्ज्ञांचे मत असल्याचा हवाला देत सांगण्यात आले आहे. रुग्णाला दोन लिटर ऑक्‍सिजन प्रतिमिनीट देण्याची आवश्‍यकता असते त्याऐवजी हे प्रमाण आठ लिटर प्रतिमिनीट इतके वाढलेले काही रुग्णालयात आढळून आले. तर काही ठिकाणी ऑक्‍सिजन परिचारिकांऐवजी रुग्णच कमी जास्त करत असल्याचे दिसून आले. हे त्यांच्या प्राणावर बेतण्याएवढे घातक आहे, मात्र त्याकडे ही रुग्णालये दुर्लक्ष करत असल्याचे या परीक्षणात दिसून आले.

 

रुग्णालयातील त्रुटी…
रुग्णाला गरजेपेक्षा जास्त ऑक्‍सिजन पुरवठा
92 टक्‍केपर्यंत आवश्‍यक ऑक्‍सिजन पुरवठ्याचे प्रमाण काही ठिकाणी 98 टक्‍केपर्यंत
प्रतिमिनिट 2 लिटर ऑक्‍सिजन ऐवजी 8 लिटरचा वापर
ऑक्‍सिजन टाकीपासून पाइपलाइन, व्हॉल्व्ह यामध्ये गळती
रुग्ण जागेवर नसतानाही ऑक्‍सीजन सुरूच
विनाकारण ऑक्‍सिजन लावला जाणे
रुग्णांनी स्वत:हूनच ऑक्‍सिजनचीपातळी बदलणे

ऑक्‍सिजन ऑडिटमध्ये सुरवातीला 11 शासकीय रुग्णालयात हे ऑडिट करण्यात अले. त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या. जेवण किंवा अन्य कारणासाठी रुग्णाचा ऑक्‍सिजन काढला तरी, तो सुरूच असतो. वॉर्डसह ज्या ठिकाणाहून ऑक्‍सीजन सप्लाय होतो त्या पाइपमध्येही गळती असल्याचे दिसून आले. त्याबाबत रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहे. दरम्यान, 111 पथकांच्या माध्यमातून 639 रुग्णालयातील ऑक्‍सिजनचे ऑडिट होणार असून, त्यामध्ये कारवाई करणे हा मुख्य उद्देश नसून ऑक्‍सिजन गळती रोखणे आणि आवश्‍यक त्याला तात्काळ ऑक्‍सिजन मिळणे, हाच उद्देश आहे.
– विजयसिंह देशमुख, अपर जिल्हाधिकारी

प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात ऑक्‍सिजन दिला गेल्यास रुग्णाची फुफ्फुसे निकामी होऊ शकतात. त्यामुळे रुणालयांना ऑक्‍सिजन पुरवठा 90 ते 92 या प्रमाणात ठेवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे रुग्णांची हानी होणार नाही आणि ऑक्‍सिजनची बचतही होईल.
– डॉ. डी. बी कदम,प्रमुख जिल्हा करोना टास्क फोर्स

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.