पुणे : पीएमपीएमएलचे कर्मचारी, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियासाठी राबविली जात असलेल्या अंशदाई वैद्यकीय सहाय योजनेंतर्गतची वैद्यकीय बिलांची रक्कम मिळाली नसल्याचे कारण पुढे करीत शहरातील रुग्णालयांनी उपचार बंद केले आहेत. पीएमपी कर्मचाऱ्यांना उपचार देण्यास नकार दिला जात असून, कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना उपचारासाठी विविध रुग्णालयांची दारे शोधावी लागत आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) कर्मचारी, अधिकारी व त्यांचे कुटुंबिय आणि निवृत्त कर्मचारी यांच्यासाठी अंशदाई वैद्यकीय सहाय योजना, राबवली जाते. पीएमपीमध्ये जवळपास आठ हजार ३०० कर्मचारी कामाला आहेत. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी, दोन मुलांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातून ठराविक रक्कम कपात करून घेतली जाते. महिन्याला साधारण ७५ लाख रुपये वैद्यकीय योजनेसाठी गोळा केले जातात. या योजनेत उपचाराचा खर्च पीएमपी ९० टक्के आणि दहा टक्के स्वतः कर्मचाऱ्यास भरावा लागतो.
या योजनेत शहरातील सर्व नामांकित रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेमुळे पीएमपीच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगले उपचार मिळण्यास मदत होते. तसेच, साधारण तीन हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील या योजनेचा मोठा आधार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीकडून महत्वाच्या रुग्णालयांची वैद्यकीय बील थकली आहेत. त्यामुळे महत्वाच्या आणि एकाच छत्राखाली सर्व उपचार मिळणाऱ्या रुग्णालयांकडून पीएमपीच्या कर्मचाऱ्यांवर उपचार सुविधा देण्यास नकार दिला जात आहे, त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांत उपचार मिळावेत याकरीता पीएमपी प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.
बिलांचे अडीच कोटी दिले…
पीएमपीकडून रुग्णालयांची वैद्यकीय बिलांचे पैसे टप्प्या-टप्प्याने दिले जातात. नुकतेच सर्व रुग्णालयांना बिलांचे अडीच कोटी रुपये देण्यात आले आहेत. तरीही रुग्णालयांनी उपचार सुविधा बंद कली आहेत. इतर सरकारी विभागाची बिले थकली तर त्यांना उपचार दिले जातात. मात्र, पीएमपीचे बील थकले तर उपचार बंद करणे योग्य नसल्याची भावना पीएमपीमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.