पुणे – ‘नदी संवर्धनात कॉंक्रीटीकरण नको’

पुणे – नदी सुधारणेबाबत प्रशासनाला जाग आली असून, नदीसुधारणा प्रकल्पांतर्गत विविध कामांबाबत प्रशासनाकडून चर्चा केली जात आहे. मात्र, नदी सुधारणा आणि संवर्धनाबाबत काम करताना नदी परिसरात कॉंक्रीटीकरणावर भर देण्याकडे प्रशासनाचा ओघ असून, यामुळे नदी परिसंस्था धोक्‍यात येऊ शकते. त्यामुळेच नदी संवर्धन करताना कुठेही कॉंक्रीटीकरण होऊ नये, अशी चिंता शहरातील पर्यावरणप्रेमींनी व्यक्‍त केली आहे.

शहरातील नद्यांमधील वाढते प्रदूषण, नदीकाठ परिसरात टाकला जाणारा राडारोडा, घरगुती कचरा, प्रक्रियाविरहित सांडपाण्याचे नदीत मिसळण्याचे वाढते प्रमाण अशा विविध कारणांमुळे नदी मृतावस्थेत पोहोचली आहे. मुळा-मुठा नदीच्या संवर्धनासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपायांबाबत विचार केला जात आहे. यातीलच एक प्रस्ताव आहे नदीकाठ विकसन प्रकल्प म्हणजेच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट. या व्यतिरिक्‍त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उभारणी सारखे प्रकल्पही महापालिकेकडून राबविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, नदीसंवर्धनासाठी नदी नैसर्गिक जैवविविधता, तिची परिसंस्था जपणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच नदीकाठ विकसन प्रकल्पामध्ये कॉंक्रीटीकरणावर भर न देता, नैसर्गिक परिसंस्थेच्या विकसन आणि संवर्धनावर जोर देण्यात यावा, अशी मागणी शहरातील पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. तसेच, याबाबत विविध संस्था एकत्र येऊन प्रयत्न करणार असल्याचेही या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.