खडकवासला (विशाल भालेराव) – खडकवासला, सिंहगड रस्ता परिसरातील हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हॉटेल, फार्महाऊसवरील विविध कार्यक्रमांत तीव्र क्षमतेच्या तसेच विनापरवानगी “डिजे’समोर थिरकणे आता महागात पडणार आहे, याबाबत हवेली पोलिसांनी सूचनापत्रक काढले असून कडक कारवाईचा इशारा दिल्याने डिजे वाल्यांना आवाज कमीच… ठेवावा लागणार आहे.
भोंग्याचे प्रकरण सध्या तापलेले असताना वाढत्या आवाजामुळे डिजेबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे गेल्या आहेत. यावर तातडीने कार्यवाही म्हणून पोलिसांनी सूचनापत्रक काढले असून 40 डेसिबलपेक्षा कमी आवाज ठेवण्याची सूचना केली आहे. सध्या, “डीजे’वाले 70 किंवा त्याहीपेक्षा अधिक डेसिबलने गाणी वाजवत आहेत. याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्यानेच तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. हवेली पोलिसांनी सूचनापत्रक काढल्याने ध्वनिप्रदूषण रोखण्यासह लहान मुले व वृद्धांना दिलासा मिळणार आहे.
या घटना घडल्या…
लग्नकार्यात कानठळ्या बसविणाऱ्या डीजेसमोर नाचणाऱ्यांपैकी दोन युवकांची शुद्ध हरपल्याची घटना धनकवडी गावठाण येथे घडली होती. या कार्यकर्त्यांच्या हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना एक दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले. तर त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यास 12 तास लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सिंहगड परिसरात डीजेच्या तालावर नाचणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
तीव्र आवाजात डीजे वाजवणे चुकीचेच आहे. दोन गाण्यानंतर 15 ते 20 मिनिटांची विश्रांती घेणे गरजेचे असताना मोठ्या आवाजाचा मारा सलग होत असल्याने कान तसेच मेंदूतील नसांना इजा होऊ शकते.
– डॉ. संगीता तिवारी (कान, नाक, घसा तज्ज्ञ)
डीजे लावलेले निदर्शनास आले तर संबंधित हॉटेल, फार्महाऊस मालक आणि डीजे मालकांवर कायदेशीर कारवाई करणार आहोत. नागरिकांनी पोलीस परवानगी घेऊनच डीजेचा मर्यादेत वापर करावा.
– तेगबीरसिंह संधु, प्रभारी सनदी अधिकारी, हवेली पोलीस ठाणे