पुणे – पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी महापालिकेकडून पीएमपीला 24 कोटींची उचल देण्यास स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या बोनसचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयाचा फायदा पीएमपीच्या दहा हजार कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. महापालिका कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर बोनसची रक्कम दसऱ्यापूर्वी मिळावी, अशी मागणी पीएमपीच्या वेगवेगळ्या कामगार संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार, पीएमपी प्रशासनाकडून महापालिकेकडे संचलनतूट तसेच इतर देयकामधील आगाऊ रक्कम देण्याची मागणी करणारा प्रस्ताव महापालिका प्रशासनास दिला होता. त्यानुसार प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवला होता. त्यास समितीने मान्यता देत बोनससाठी आगाऊ 24 कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली असल्याचे रासने यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी करोनाकाळात बससेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, करोनाकाळात अत्यावश्यक सेवा आणि विलगीकरण केंद्रांवर पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी उत्तम सेवा बजावली असल्याचे रासने यांनी यावेळी सांगितले.
पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला दहा कोटी रुपये अदा करण्यासाठीही स्थायी समितीने मान्यता दिली. सीएनजीची सुमारे 40 कोटींची थकबाकी असल्याने एमएमजीएलकडून सीएनजी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यानंतर, वारंवार पीएमपीकडे या थकबाकीबाबत मागणी केली जात होती. अखेर महापालिकेने पीएमपीला संचलनतूटीच्या तसेच वेगवेगळ्या पासच्या रकमेपोटी द्यायच्या निधीतून 10 कोटींची ही रक्कम देण्यात आली.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती