मंचर – गुलाबी थंडीत दुकान व घरांच्या दारांसमोर रेखाटलेल्या सुबक रांगोळ्या, पानाफुलांच्या तोरणांनी सजलेले प्रवेशद्वार अन् आकाशकंदील, पणत्या, दीपमाळेचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात गुरुवार, दि.३१ रोजी सायंकाळी लक्ष्मी आणि कुबेर पूजन मंचर (ता.आंबेगाव) येथे पार पडले.
यानिमित्ताने घराघरात, दुकानांमध्ये आणि कार्यालयात श्रीलक्ष्मीची, वह्या आणि खातेपुस्तिकांची मनोभावे पूजा पार पडली. यंदा अश्विन शुद्ध चतुर्दशी च्या दिवशी अंगाला तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान केले. काहींनी सकाळीच शहरातील बाजारपेठा गाठून लक्ष्मीची मूर्ती, झेंडूची फुले आणि पूजाविधीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळ होताच लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली.
शहर-ग्रामीण भागातील दुकानेही आकर्षकरीत्या सजविण्यात आली होती. मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे उजळले अन् पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या कुटुंबीयांनी सायंकाळी मुहूर्त साधून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लक्ष्मीचे पूजन केले. मंचर येथील उत्तमभाग्य कलेक्शनचे संदीप म्हसे, साई फर्निचरमध्ये अजय घुले, श्रीराम ज्वेलर्समध्ये गोरक्षनाथ कदम, निलेश कदम, निकेत कदम, अवसरी खुर्द येथील निती मसाले कारखान्यात मिलिंद खुडे, गावडेवाडी-डेरेआंबा येथे साई इंडस्ट्रीमध्ये संतोष गावडे, अंबिका इलेक्ट्रॉनिक्समध्ये हरसुख पोकार,एस सुपर शॉपीचे मालक प्रवीण शिंदे यांनी लक्ष्मीपूजन केले. मुहूर्ताची वेळ जसजशी जवळ येत होती, तशी व्यापारी- कर्मचाऱ्यांची पूजेची लगबग वाढत होती. लक्ष्मीपूजनासोबतच प्रथेप्रमाणे चोपड्या-वह्या, खातेपुस्तिका आणि दुकानाची पूजा पार पडली.लक्ष्मीपूजनाची माहिती किशोर महाराज जोशी,हरेश महाराज जोशी यांनी दिली.
“आनंदोत्सवाचे मांगल्यमय आणि आनंदाचे दिवस असल्याने दिवाळीच्या सणानिमित्त व्यापारी बांधवांसहित सर्वच नागरिक लक्ष्मीची पूजा करतात. घरामध्ये धनधान्य, सुखसमृद्धी लाभावी यासाठी महालक्ष्मी म्हणजे धन, महाकाली म्हणजे सक्षमता आणि सरस्वती म्हणजे शिक्षण, अभ्यास आणि आरोग्य या हेतूने देवींचे पूजन केले जाते. त्यामुळे व्यापारात, धनधान्यात, धनलाभात भरभराट होऊन आयुष्य सुखी समाधानी होण्यास मदत होते.”
– सोमनाथ खुडे, व्यापारी, मंचर