बेलसरमध्ये धक्कादायक प्रकार : पुरंदर आरोग्य विभागाचा निद्रिस्तपणा
बेलसर – बेलसर (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शुक्रवार (दि.13) कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी लॅप्रोस्कोपी (बिनटाका नसबंदी शस्त्रक्रिया) शिबिरावेळी पुरंदर आरोग्य विभागाच्या बेजबाबदार नियोजनामुळे महिलांना शस्त्रक्रिया न करता परत जावे लागले. दिवसभर उपाशी असलेल्या महिला आणि काही आदल्या दिवशी उपाशी असलेल्या 54 महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे महिला तसेच नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पुरंदर तालुक्यामधून साधारणतः शंभर महिला शस्त्रक्रिया करण्यासाठी बेलसर आरोग्य केंद्रात दाखल झाल्या होत्या. परिंचे, वाल्हे, नीरा, माळशिरस, बेलसर आरोग्य केंद्राअंतर्गत महिलांची शस्त्रक्रिया (दि.13) होणार होती. परंतु शंभर उपस्थित महिलांपैकी फक्त 46 महिलांची शस्त्रक्रिया केली. परंतु 54 महिलांना दोन दिवस उपाशी ठेवून माघारी पाठवले.
जिल्ह्यामध्ये तीन सर्जन मान्यताप्राप्त आहेत. सर्जन यांच्या सांगण्यानुसार मर्यादित शस्त्रक्रिया घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांना प्रत्येकी दहा रुग्ण बेलसरला आणावयास सांगितले. परंतु केंद्राच्या अधिकाऱ्यांनी अधिकचे रुग्ण बेलसर येथे आणल्याने ही सद्यस्थिती उद्भवली.
परिंचेतून 30 ते 40, वाल्हेमधून 10, नीरा येथून 10, बेलसरमधून 73, तर माळशिरसमधून 10 रुग्ण दाखल झाले होते. त्यासोबतच तालुक्यातील ज्या महिलांना शस्त्रक्रिया करावयाची होती, अशा महिलाही न बोलवता उपस्थित होत्या. त्यामुळे महिलांची संख्या वाढली. अपुरा कर्मचारी वर्ग, ढिसाळ नियोजनाचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र केंद्राच्या आवारात पाहावयास मिळाले. सर्जन यांच्या बदललेल्या नियोजनामुळे रुग्णांना त्रास झाल्याची चर्चा होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने अधिकचे रुग्ण आणल्यामुळे बेलसरला रुग्णांची संख्या वाढली होती.
– विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी, पुरंदर.
शस्त्रक्रियेसाठी तालुक्यातून 50 रुग्णांची नोंदणी झाली होती. यामुळे सद्यस्थिती ओढावली. बरेचसे रुग्ण न बोलता आले होते. एकूण शंभरच्या आसपास रुग्ण शस्त्रक्रियेसाठी आले होते. परंतु सर्जन यांनी 50 महिलांची शस्त्रक्रिया करणार असल्याचे सांगितल्याने अतिरिक्त वाढलेले रुग्ण परत पाठवले.
– सागर डांगे, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलसर.