चाकण : गेली 25 वर्षे लालफितीत अडकून पडलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या चारपदरी रस्त्याचे कामासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच 2025-26 च्या अर्थसंकल्पात 6 हजार 499 कोटी रुपयांची तरतूद केल्याने गेली. 25 वर्षे लालफितीत अडकून पडलेल्या या रस्त्याचे काम आता तरी मार्गी लागणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर चाकण येथील तळेगाव चौकातील सेवारस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली आहे. चौकात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागू नयेत आणि वाहने चौकातून पुढे सहजपणे जावीत, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र, या उपाययोजना काही अंशीच परिणामकारक ठरत असल्याचे वाहतूक कोंडीने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाकणमधील प्रस्तावित बाह्यवळण मार्ग आणि रिंगरोड झाल्यास या महामार्गांची प्रस्तावित कामे होण्यापूर्वी वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा नागरिक, प्रवासी व्यक्त करीत आहेत.
पुणे जिल्ह्यासाठी रिंगरोड प्रस्तावित आहे. त्याचे काम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडी दूर होऊन राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग याची थेट कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, निघोजे, मोई, कुरळी, चिंबळी, केळगाव, आळंदी देवाची, चर्होली खुर्द, धानोरे, सोळू, मरकळ, गोलेगाव आणि मावळ तालुक्यांतील परंदवाडी, उर्से, तळेगाव दाभाडे, वडगाव, कातवी, आंबी, वराळे, आकुर्डी, नाणोलीतर्फे चाकण, इंदुरी, सुदवडी, सुदुंबरे या गावांतून रिंगरोड जाणार आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असल्याचे सांगितले जात आहे.
बाह्यवळण मार्गाची हद्द निश्चिती करण्यात येणार
चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चाकणजवळील रासे फाटा, कडाचीवाडी, मेदनकरवाडी भागातून प्रस्तावित बाह्यवळण मार्गाची हद्द निश्चिती करण्यात येणार असल्याचे प्रशासनातील अधिकारी सांगत आहेत. मागील अनेक वर्षे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) बाह्यवळण मार्गाचे आश्वासन देत असले, तरी प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. वडगाव-तळेगाव-चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरील प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणे, कमी रुंदी आणि अपघातप्रवण ठिकाणे, यामुळे हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या रस्त्याचे गेली अनेक वर्षे लालफितीत अडकलेले काम सुरू होण्याची नागरिकांना अपेक्षा होती.
जमीन अधिग्रहणला येणार वेग?
मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता जमीन अधिग्रहण आणि निविदा प्रक्रियेला वेग येणार आहे. तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चारपदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. तळेगाव, चाकण ते शिक्रापूर हा एकूण 53 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (मुंबई-पुणे महामार्गाला) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 पुणे-संभाजीनगर महामार्गाशी जोडणार आहे. यामुळे पुण्याजवळील वाहतूक कोंडी कमी होईल. या प्रकल्पामध्ये सध्याच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरी उन्नत महामार्गात रूपांतर करणे आणि तळेगाव ते चाकणदरम्यान महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6,499 कोटी खर्च अपेक्षित असून, तो टोलवसुली किंवा कर्जाद्वारे उभारला जाणार आहे. एमएसआयडीसी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून स्पष्ट केले आहे.