पुणे जिल्हा : सतीश काकडे तलवार म्यान करणार?

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेकडे “सोमेश्‍वर’ कार्यक्षेत्राचे लक्ष
शेतकरी कृती समिती सर्व जागांवर निवडणूक लढवणार

बारामती (प्रतिनिधी) – सोमेश्‍वर कारखान्याच्या निवडणुकीच्या रिंगण्यात शेतकरी कृती समिती सर्व जागांवर उमेदवार उभे करणार असून समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनीही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत त्यांची झालेली दिलजमाई संपुष्टात आल्यात जमा आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या चर्चा करणार का? आणि चर्चा केली तर काकडे आपली तलवार म्यान करणार की निवडणूक लढविण्यार ठाम राहणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

श्री सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनमानी कारभार, सभासदांना विश्‍वासात न घेणे, कृती समितीच्या मागण्यांना कोणताही प्रतिसाद न देणे, उद्धट वागण्यामुळे आणि शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर राखुन निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सतीश काकडे यांनी निंबूत येथे सोमवारी (दि. 15) झालेल्या सभेत जाहीर केले.

काकडे आणि पवार परिवाराचे “प्रेम’ सर्वश्रूत आहे, मात्र दोन वर्षांपूर्वी काकडे आणि पवार परिवारामध्ये दिलजामाई झाली होती. तेव्हापासून सोमेश्‍वर कारखान्यातील विरोधकास पवारांनी आपल्या बाजूने केल्याने कारखान्यामध्ये विरोधकच शिल्लक नसल्याचा एक संदेश सोमेश्‍वरच्या कार्यक्षेत्रात गेला होता; मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी काकडे कायमच कारखाना प्रशासनाच्या विरोधातच आपली भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी वारंवार न्यायालयात दाद मागण्याची भाषा केली होती; मात्र त्यानंतर ते न्यायालयात गेले की नाही याबाबत कार्यक्षेत्रात कोणतीही चर्चा होत नसे. त्यामुळे आता तरी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय काकडे यांनी घेतला असला तरी ते आपला निर्णय बदलून निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार की जाहीर केल्याप्रमाणे निवडणूक लढवणार हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक रिंगणात उतरणार असून कार्यकर्त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. अर्ज छाननीनंतर समितीच्या वतीने कार्यकत्यांची बैठक बोलविली जाईल त्यावेळी समविचारी पक्षांना एकत्र घेत पुढील दिशा ठरविली जाईल.
– सतीश काकडे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.