रेडा -नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना शासन दरबारी लवकर मदत मिळावी, यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील न्हावी, देवकर लोणी तसेच गागरगाव लोंढेवस्ती परिसरात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी माने यांनी नुकतीच केली. पिकांचे व घरांचे नुकसानीच्या पाहणीवेळी माने यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
माने म्हणाले की, शेती आणि घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकर करून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. आपत्तीचा सामना करताना आम्ही तुमच्या पाठिशी आहोत. बिजवडी, गागरगाव, लोंढेवस्ती भागातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आधार देण्याची भूमिका घेतली जाईल.
लोणी देवकर गावातील परिस्थितीचा अंदाज घेतला. यावेळी माने बांधावर जाऊन दिलासा दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना मनापासून उभारी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.