पुणे – जिल्हा परिषदेने 13 व्या आणि 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवला होता. त्यावर शासनाने निधी जमा करण्यास सांगून रुग्णवाहिका खरेदीबाबत पुन्हा प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव पाठवल्यानंतर तरी रुग्णवाहिका मिळणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वाढत्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णवाहिकांची कमतरता भासत असल्याने 30 रुग्णवाहिका खरेदीच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. दरम्यान याअधी 11 रुग्णवाहिकेचा प्रस्ताव धूळखात पडून आहे.
आता करोना संसर्ग आल्यामुळे प्रशासन पुन्हा जागे झाले असून, याबाबत शासनाकडे जिल्हा परिषदेने प्रस्ताव सादर केला होता. रुग्णवाहिका खरेदीबाबतचे दि. 9 सप्टेंबर रोजी शासनाकडे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सादरीकरण करण्यात आले होते. त्यामध्ये राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार शासनाकडून तसा जिल्हा परिषदेला आदेश देण्यात आला असून, राज्य प्रकल्प राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या संचालकांकडे 14 व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 13 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजाची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले आहे.