मंचर – क्षयरोग आणि कुष्ठरोग या दोन आजारांची माहिती घेण्यासाठी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने दि. 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
घोडेगाव येथे पंचायत समिती कार्यालयात विविध विकासकामे आणि करोनासंदर्भात आढावा घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. प्रसाद म्हणाले, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने क्षयरोग आणि कुष्ठरोग या दोन आजारांची माहिती घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेक्षणातून क्षयरोग आणि कुष्ठरोग आजार असणाऱ्या व्यक्तींचे सॅम्पल घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर शासनाच्या वतीने वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे. त्यामुळे हे आजार असणाऱ्या व्यक्तींची माहिती द्यावी. कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्गामुळे हे आजार आजारी व्यक्तीच्या माध्यमातून होऊ शकतात. याबाबत शासन काळजी घेत आहे. त्यामुळे कुटुंबातील वरील आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तीची माहिती सर्वे टीमला द्यावी.
जिल्ह्यात क्षयरोग आणि कुष्ठरोग्यांची संख्या अधिक आहे. मे 2020 अखेर जिल्ह्यात 4,140-शासकीय, तर 554 रुग्ण हे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापयर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू या आजाराने घेतला आहे. करोनामुळे जिल्ह्यातील क्षयरोग आणि कुष्ठरोग्यांना उपचार मिळण्यास अडचणी आल्या. दि. 1 ते 31 डिसेंबरदरम्यान आशा सेविका तसेच प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी घरोघरी हे सर्वेक्षण करणार आहेत.
शासन करणार खर्च
या मोहिमेअंतर्गत उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांचा खर्च शासन करणार आहे. उपचार संपेपयर्यंत त्यांना 500 रुपये दरमहा दिले जाणार आहे. हे अनुदान डीबीटी योजनेमार्फत रुग्णांच्या बॅंक खात्यावर जमा केले जाणार आहे. आतापर्यंत 5 कोटी 8 लाख 15 हजार रुपये अनुदानापोटी वाटप करण्यात आले आहेत.