आज-माजी आमदारांना राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराव झेंडेंचा सवाल
फुरसुंगी – पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये असणार्या शहरी भागातील हवेली तालुक्यातील या गावांचे प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. त्याच बरोबर या भागातील वाहतूक, रस्ते, पाणी, लाइट, ड्रेनेज यासारख्या असंख्य समस्या आजही आहेत. त्या सोडवण्यासाठी आजी-माजी आमदारांनी कोणतेही पावले उचलली नाही. 15 वर्षांमध्ये या भागाचा विकास का करता आला नाही, असा प्रश्न या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी विचारला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ उंड्री येथे पदयात्रा काढण्यात आली होती. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कोपरा सभेत ग्रामस्थांशी झेंडे यांनी दिलखुलास संवाद साधला. फुरसुंगी, वडकी, भेकराईनगर, या भागामध्ये दुचाकी रॅली काढण्यात आली. यानंतर मतदारांशी जन संवाद साधल्यानंतर गेल्या 15 वर्षांत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची कामगिरी पाहता यंदा परिवर्तन घडविण्याचा नागरिकांचा संकल्प आणखी मजबूत झाला असल्याचे झेंडे यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी नगरसेवक गणेश ढोरे, वडकीचे माजी सरपंच उत्तम गायकवाड, सुहास कड, अमोल कामठे, सुधीर झेंडे, गणेश झांबरे, विजय दगडे, नवनाथ मासाळ, सागर काळे, राहुल चोरघडे, प्राचि देशमुख, अमित हरपळे उपस्थित होते.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना तयार केली व या माध्यमातून सर्व महिलांना आर्थिक सक्षम बनवण्याचे काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शेतकर्यांसाठी मोफत शेतीसाठी लाइटबिल योजना तयार केली. या माध्यमातून अनेक शेतकर्यांना याचा फायदा झाला. शहरी भागाचा विकास करण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी संभाजी झेंडे यांना आमदार बनवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
फुरसुंगी, भेकराईनगर, उरुळी देवाची या भागामध्ये टॅक्सटॅक्सचा प्रश्न मोठ्या प्रमाणात असून हा कमी करण्यासाठी भविष्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहे.
– गणेश ढोरे, माजी नगरसेवक