fbpx

पुणे जिल्हा: स्वच्छतेची सवय लागणार तरी कधी?

नीलकंठ मोहिते 

रेडा -पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्‍यांबरोबर इंदापूर तालुका हगणदारीमुक्‍त झाला. त्याचा मोठा गवगवा कागदोपत्री जिल्हाभर करण्यात आला. तालुक्‍यातील काही गावांत हगणदारी मुक्‍तीचे फलक मोठ्या दिमाखात टांगले आहेत.

मात्र, गावातील चित्र निराळेच आहे. एकीकडे हगणदारीमुक्‍त तालुक्‍यात आपले स्वागत आहे, असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी, अधिकारी धडपड करत होते. मात्र, ग्रामीण भागात नव्याने बांधलेल्या शौचालयात चुलीसाठी लागणारे जळण, गोवऱ्या, जनावरांचा चारा, अडगळीच्या वस्तूंनी खचाखच भरलेली आहेत.

बावडा, निमगाव केतकी तसेच भिगवण परिसरातील अनेक गावांत आजही नाक धरुनच नागरिकांना प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे गावागावांत “पाटी मात्र टांगली अन्‌ योजना लवकरच बारगळली’ अशी हगणदारीमुक्‍त गावांची स्थिती झाली आहे.

इंदापूर तालुक्‍यातील शौचालये बंद का पडली. याचा विचार पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशासनाने करणे आवश्‍यक आहे. संसर्गजन्य आजार जीवघेणा ठरत आहे. हे प्रत्येक गावाने तसेच नागरिकांनी डोळ्यांनी पाहिले व अनुभवले आहे. तरीदेखील तालुक्‍यातील अनेक गावातील नागरिक उघड्यावर शौचास जात आहेत. त्यामुळे हगणदारीमुक्‍त तालुक्‍यात दुर्गंधीचा गवगवा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

नागरिकांना पंचायत समितीच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये अनुदान मिळते. या लालसेपोटी अनेकांनी शौचालय बांधण्यासाठी पुढे येत प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने शासनाला संपूर्ण राज्य हगणदारीमुक्‍त करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवण्यासाठी कोट्यवधींचा निधी तालुक्‍याला दिला गेला.

मात्र खऱ्या अर्थाने संबंधित ग्रामपंचायतीने जबाबदारी म्हणून गावांवर कमांड ठेवायला हवी होती. ती पकड ठेवली नसल्यामुळे, इंदापूर पंचायत समिती प्रशासनाने न केलेल्या तपासण्या व ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे गावातील काही बोटावर मोजण्याइतकीच कुटुंबे शौचालयाचा वापरत असल्याचे दिसून येत आहे.

प्रत्येक कुटुंबाला हक्‍काचे शौचालय असावे. यासाठी शासनाने कोट्यवधींचा खर्च करूनदेखील हा खर्च मातीमोल झाल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात स्पष्ट दिसत आहे.

गुडमॉर्निंग पथक तात्काळ नेमण्याची गरज
इंदापूर पंचायत समितीच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन मागील काही कालावधीमध्ये गुडमॉर्निंग पथक सकाळच्या प्रहरी गावागावांत कारवाईसाठी येत होते. त्यामुळे पथकाच्या भीतीने व कारवाईमुळे नागरिक शौचालयाचा वापर करत होते.

मात्र ही गुडमॉर्निंग पथके बंद झाली. त्यामुळे गावागावांत जाणारे रस्ते दुर्गंधीमय झाले आहेत. त्यामुळे गावांमध्ये नवीन पाहुणा येणारा, नको रे बाबा असले गाव, असे म्हणून गावाबद्दल आपलेपणा दाखवत नाही. त्यामुळे स्वच्छ व सुंदर गाव ठेवायचे असतील तर गुडमॉर्निंग पथक तात्काळ नेमण्याची गरज आहे.

करोनाचा कालावधी असल्यामुळे शासकीय यंत्रणा करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. असे असले तरीदेखील प्रत्येक गाव कायमस्वरूपी सुंदर, स्वच्छ राहिले पाहिजे. ही शासनाची भूमिका आहे.त्यामुळे इंदापूर तालुक्‍यातील ज्या गावांमध्ये अस्वच्छता आहे, त्या गावांतील नागरिक उघड्यावर शौचास असतील, तेथे गुडमॉर्निंग पथक मोहीम राबवली जाणार आहे.
– विजयकुमार परीट, गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.