इंदापूर – मुलगी झाली प्रगती झाली असे म्हणत, इंदापूर शहरातील सोनाईनगर येथील शिंदे परिवाराने मुलीच्या जन्माचे अगदी जंगी स्वागत केले. मुलगी वाचवा हा संदेश देत, जनजागृती करून, फुलांच्या पायघड्या टाकत घरात श्रीशा नावाच्या गोंडस मुलीचा, बॅंड बाजा लावून, मिरवणूक काढून, घरात स्वागत केले.
इंदापूर शहरातील सोनाईनगर येथील सौरभ लक्ष्मण शिंदे व अमृता सौरभ शिंदे या दाम्पत्याला पहिलीच मुलगी झाली. दौंड तालुक्यातील यवत येथील बधे कुटुंब, माहेर असलेल्या अमृताताईंनी आपल्या गोंडस “श्रीशा’ मुलीला घेऊन, सासरी येत असताना, सासरच्या शिंदे कुटुंबीयांनी त्यांच्या कुटूंबाची मुलगी “श्रीशा’चे सवाद्य स्वागत केले.
यावेळी परिसरातील महिलांनी “श्रीशा’चे औक्षण केले. यावेळी फुलांच्या पायघड्या टाकत फुलांच्या वर्षाव करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत मुलीचे स्वागत केले. यावेळी महिलांनीही, घोषणा दिल्या, मुलगी वाचवा! मुलीला अधिकार द्या! मुलाप्रमाणे प्रेम द्या… ! अशा आशयाचे सामजिक संदेश असलेले फलक हातात घेतले होते. मुलगी वाचवा असा संदेश देणारे फलक हातात घेऊन जनजागृती केली.
यावेळी शिंदे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. घरामध्ये सर्वत्र सजावट करून फुगे व फुलांचे तोरण बांधून तसेच घरांमध्ये मुलींच्या नावाने तयार केलेले सदाबहार गीते लावून, मायलेकींची स्वागत केले. मुलीच्या जन्माचे एवढ्या आनंदात स्वागत करणारे, इंदापूर येथील सौरभ शिंदे कुटुंबाने मुलीच्या जन्माचे केलेले हे स्वागत पाहून, सर्व स्तरातून शिंदे परिवाराचे कौतुक केले.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिकामामी भरणे, नगराध्यक्षा अंकिता शहा, अनुराधा गारटकर, नगरसेविका हेमलता माळुंजकर व परिसरातील शेकडो महिलांनी शिंदे परिवाराचे कौतुक केले.
“समाजातील मुलगा व मुलगी असा भेदभाव आपण नाहीसा केला पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता, दोन्ही घरात प्रकाश देणाऱ्या मुलीच्या जन्माचे सर्वांनी शिंदे परिवारासारखे आनंदाने स्वागत करावे.”
-अंकिता मुकुंद शहा, नगराध्यक्षा इंदापूर