पळसदेव : उजनी धरणाच्या काठावरील गाव म्हणूण पळसदेव गावाची ओळख आहे. उजनी धरणाच्या पट्ट्यातील सधन गाव म्हणून पळसदेवची वेगळी ओळख आहे; मात्र उजनीच्या काठावरील आणि भरपूर पाण्याचं गाव असलेल्या पळसदेव गावातील सध्या अनेक विहिरी व बोअरवेलची पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
फेब्रुवारी महिन्यातच गावात व वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई जणू लागली आहे. आणखी तर पाच महिने बाकी आहेत. पावसाळा सुरु झाला तरी लगेच विहरी व बोअरवेलची पाणी पातळी वाढत नाही. त्यासाठी जुलै महिना उजडावा लागतो त्यामुळे येणार्या काळात उजनी काठी असून देखील पळसदेव गावात पाणी-बाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतीसोबत गावाला पाणी पुरवठा करणार्या विहरीची देखील पाणी पातळी खालावली आहे. माळेवाडी भागात अगदी दिवसातून दिड ते दोन तसाच विद्युत पंप चालत आहे. शिवाय माळेवाडीला पाणीपुरवठा करणार्या विहिरीच्या परिसरात असलेल्या विहिरींचा देखील पाणीसाठा कमालीचा घटला असल्याचं मत पाणी पुरवठा कर्मचारी सुनील बनसुडे यांनी या वेळी बोलताना सांगितलं. त्यामुळे उजनीच्या काठावर असून देखील पळसदेव गावात पाणीबाणी निर्माण होणार या विचारानं शेतकरी व नागरिकात चिंतेचे वातावरण आहे.
मागील अनेक महिन्यापासून पळसदेवसह वाड्या वस्त्यांच्या भागात पुरेशी जलसंधारणाची कामे न झाल्याने सध्या ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक स्वतःच्या वापरासाठी विहिरी, बोअरवेल घेत आहेत व मुबलक पाणी वापरत आहे; मात्र जमिनीत पाणी मुरवण्याच्या बाबतीत ग्रामपंचायत व नागरिक देखील जागरूक नसल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. मागील अनेक महिन्यांपासून जलसंधारणची ठोस कामे या भागात झाली नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचं मत जाणकार नागरिक व्यक्त करत आहेत.