राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) : राजगुरुनगर येथील पोलीस कस्टडीत (लॉकअप) मध्ये पाणी घुसले. दरम्यान कस्टडीत आरोपी नाहीत मात्र तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांची मात्र धांदल उडाली आहे.
खेड पोलीस स्टेशनची पोलीस कोठडी खेड तहसीलदार कार्यालयात आहे. गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील पावसाचे पाणी गटार नसल्याने कस्टडीच्या मागे सखल भागातून येत आहे. पाण्याचा लोंढा जास्त असल्याने हे पाणी भिंतीमधून आत शिरले आहे. जवळपास गुडघाभर पाणी साचल्यामुळे ड्युटीवर असलेल्या पोलिसांची मोठी धांदल उडाली आहे. रात्रभर त्यांना जागून काढावी लागली. दरम्यान पोलीस कोठडीत आरोपी नाहीत.
सध्या राजगुरुनगर शहरात रस्त्यांची गटारांची कामे भर पावसात सुरु आहेत. ती अनेक दिवसांपासून सुरु असून धीम्या गतीने होत आहेत नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरु आहे. ठेकेदारानी ऐन पावसाळ्यात हि कामे सुरु केल्याने सगळ्यांचे हाल होत आहेत.
गेली दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पुराचे स्वरूप आले आहे काही घरात दुकानात गटाराचे आणि पावसाचे पाणी घुसले आहे. मुसळधार पावसामुळे आणि शहरातील पाण्याचे प्रवाह नको त्या ठिकाणी जात आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकंना मोठा त्रास सहन करावा लागत आहे